Monday 3 September 2018

भिडे वाडा व्हेंटिलेटरवर आहे....!

              सन १८४८ भारतात इंग्रज राजवट सुरू होती. समाज अज्ञान, दारिद्य्र, स्त्री-पुरुष भेदभाव, उच्च-निचता या सारख्या अनेक समस्यांनी ग्रासलेला होता. याकाळात मुलींना शिक्षण घेणे तर दूरच पण माणूस म्हणून मुक्तपणे जगण्याचा अधिकार देखील नव्हता.
                 अश्यावेळेस महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले या दांपत्याने समाजातील कर्मठ रुढी परंपरांविरुध्द बंड पुकारले. समाजातील ही विषमता नष्ट करायची असेल तर तळागाळातील लोकांपर्यंत विशेषतः स्त्रीयांपर्यंत शिक्षण पोहचवणे आवश्यक आहे हे त्यांनी जाणले. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यामधील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची देशातील पाहिली शाळा या दांपत्याने सुरू केली. ही शाळा चालवणे सोपे नव्हते. पुण्यातील कर्मठ सनातनी लोकांनी याला विरोध केला. मात्र या विरोधाला न जुमानता सावित्रीबाईंनी आपले स्त्री शिक्षणाचे कार्य चालू ठेवले. भिडे वाड्यात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. हा भिडे वाडा स्त्री शिक्षणाच्या ऐतिहासिक क्रांतीचा साक्षीदार झाला. पण आज......
                   ज्या भिडे वाड्या मध्ये मुलींनी पहिल्यांदा मोकळा श्वास घेतला. तो वाडा आज अखेरची घटका मोजतोय. वाड्याच्या भिंती कोसळण्याच्या मार्गावर आहेत, छत मोडकळीस आलंय, आतमध्ये मातीचे ढिगारे आणि कचऱ्याशिवाय काही नाही. कोणे एकेकाळी येथेच स्त्री शिक्षणाचा इतिहास घडला होता. यावर विश्वास बसत नाही. अश्या या भिडे वाड्याला सरकारकडून देखील दुर्लक्षित करण्यात आलय. वाड्याच्या डागडुजीसाठी निधी मंजूर झाला असला तरी अजून त्या दृष्टीने कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. भिडे वाडा हा विद्यमान पालकमंत्री गिरीष बापट यांच्या मतदारसंघात येतो. मात्र सत्तेचा कार्यकाल संपत आला तरी देखील वाड्याच्या नव उभारणी साठी बापटांकडून केवळ आश्वासनांशिवाय कोणतेही काम झाले नाही.
         ऐतिहासिक भिडे वाड्याच्या समोरच प्रसिध्द दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिर आहे. या मंदिराची स्थापना १८९३ ची. त्यावेळेस छोटेखानी असलेल्या या मंदिराचा आत्ता मोठा विस्तार झालेला आहे. त्याच्या समोरच असलेला भिडे वाडा मात्र स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडतोय. एका बाजूला कथित विद्येची देवता आणि दुसऱ्या बाजूला विद्येचे मूर्तिमंत असलेले स्मारक या दोघांच्या विकासातील विरोधाभास आपण लक्षात घेतला पहिजे.
                   ऐतिहासिक स्थळांच्या बाबतीत आपली असलेली उदासीनता  खेददायक आहे. ऐतिहासिक स्थळांचे,  वास्तूंचे जतन व्हावे व त्यातून सर्वांनीच प्रेरणा घेवून नवनिर्मितीचा ध्यास धरावा. हा दृष्टीकोनच आपण कुठेतरी विसरत चालोय..
               ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार असलेला हा भिडे वाडा आज व्हेंटिलेटरवर आहे. या अवस्थेत तो आपल्या सर्वांच्या मदतीची वाट पाहतोय.....
     
                                                        - मुक्ताफळ
                                                   (कु.मुक्ता भारत शिंदे.)  

Thursday 9 August 2018

मन धागा धागा जोडते नवा नवा...


                त्याच आणि माझ सोयरीक कधी जुळलच नव्हतं. त्याची अवेळी येण्याची सवय, वाट पाहिला लावणं आणि मनमानी कारभार यामुळे मी काहीशी खट्टूच होते त्याच्याशी. त्या दिवशी सुद्धा तो नेहमी सारखाच अचानक आला. ( एव्हाना मला आत्ता त्याच्या अवेळी येण्याची सवय झालीये.) त्यादिवशी मात्र मी वैतागलेच जरा. त्याच्या या मस्तीखोरपणामुळे माझ्या पुढच्या प्लानची वाट लागणार होती.
                   त्याच्या अश्या अवेळी येण्यानी सगळ्यांचीच धावपळ उडाली  होती. तो काही एकटा आला नव्हता  नेहमी स्वतःच्या धुंदीत राहणाऱ्या, डोळ्याला न दिसणाऱ्या पण स्पर्शाने स्वतः च अस्तित्व दाखवणाऱ्या त्याच्या दोस्ताला घेऊन तो हजर झाला. तो भेटतो असा की काही वेळ जीव गुदमरून जावा आणि नाही भेटत तेव्हा असा की त्याच्या भेटी अभावी जीव कासावीस व्हावा. त्या दिवशी मात्र मी ठरवलं आपणच थोडं समजूतदारपणाने घेऊया. दोन क्षण त्याच्या सोबतीने घालवूया.. त्याच्या सोबत राजारामपुरी मध्ये भटकायचं या कल्पनेने मी रोमांचित झाले. कित्येक वर्षांनंतर त्याच्या सरींना मी मनमोकळेपणाने झेललं होत. त्याच्या बद्दलचा सगळा रुसवा आत्ता विरून गेला होता. चंचल धावणाऱ्या मनाला आणि विचारांना आत्ता विसाव्याची गरज होती. आपोआप पाऊलं हिंदुस्थान बेकारीकडे वळली. वाफळलेल्या कॉफीचे घोट घेताना किती तरी दिवसात जिची भेटच पडत नव्हती ती "शांती" भेटली.
                या अश्या वातावरणात रंकाळा गाठायचा विचार मनात चमकला. मग काय या सुंदर वातावरणातील रंकाळ्याचा नजराणा पाहण्यासाठी स्वारी व्याकुळ झाली. धावतच एका रिक्षावाल्याला गाठलं. वरून "वरूणराजा" बरसतोय, रस्त्यावर लाईट नाही अश्या वेळेस रंकाळ्यावर काय काम असे हावभाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. थोडीफार घासाघाशी करून मी त्याला  येण्यासाठी तयार केलं. रंकाळा माझ्या आवडीच ठिकाण.. इथं आल्यावर खूप शांत वाटत. मनातल्या विचारांच्या थैमानाला आवर घालून आपल्या सौंदर्याच्या प्रेमात पाडण्याची कला रंकाळ्यात आहे.
                 आजूबाजूच्या लोकांच भान आत्ता मला नव्हतं. रंकाळ्यानी मला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेतल होत आणि मी ही वाहवत गेले...

                            मुक्ताफळ
                    (कु.मुक्ता भारत शिंदे.)

Thursday 28 June 2018

वऱ्हाडींना भेट सैंद्रिय बियाण्याची !

            आज मानव निसर्गावर विजय मिळवण्याच्या प्रयत्नात स्वतःची आणि निसर्गाची देखील मोठ्या प्रमाणवर हानी करत आहे. विविध पर्यावरणीय समस्या निर्माण होण्यासाठी आपण बऱ्याच वेळेला निसर्गाला दोषी ठरवतो. मात्र या पर्यावरणीय समस्यांना मानवी भोगवादी वृत्ती, हाव आणि आक्रमकता कारणीभूत आहे. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून मानवाने आपला विकास घडवून आणला खरा मात्र त्याची परतफेड करायला तो विसरला.
                  पण आपल्या सभोवताली काही अशीही माणसे असतात जी निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी क्रियाशील असतात. त्यातीलच एक असलेले स्वामी दांपत्य. श्री.नागेश स्वामी व त्यांच्या पत्नी सौ.भारती स्वामी यांनी उंब्रज जवळील शिवडे या गावी सैंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी रित्या उभारला आहे. मला काही वर्षांपूर्वी शिवडे गावाला भेट देण्याची संधी मिळाली. ( तेथील अनुभवावर मी स्वतंत्र लेख लिहलेला आहे. लवकरच तो क्रमशः प्रकशित करेन.) मानव व निसर्ग एकमेकांशी जोडले जावेत असे या सैंद्रिय शेतीचे प्रयोजन केलेले आहे. ते पाहून निसर्गाचे ऋण फेडायला आपला सुद्धा हातभार लागावा असे वाटत होते. एक वर्षापूर्वी माझ्या आत्तेबहिणीच्या लग्नात येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना आपण विविध सैंद्रिय भाज्यांचे बियाणे द्यावे अशी कल्पना माझ्या डोक्यात आली.
                   भारती काकूंची स्वतःची बीज बँक आहे. बीज बँक म्हणजे विविध बियांचा संग्रह. त्यांच्याकडे विविध देशी-गावरान बियांचा संग्रह आहे. त्यांसाठी त्या भारत-पाक सीमा ते खाली दक्षिणेपर्यंत जाऊन आल्यात. देशी बियांचे संवर्धन व जतन व्हावे ही त्यांच्या बीज बँकेची उद्दिष्टे. या बीज बँकेत भेंडीचे दोन- तीन प्रकार, घेवड्याचे विविध प्रकार, करटूले, हळद, आंबट-सुका, हदगा, दुधी भोपळा, शेवगा, घोसावळे, हिरडा बेहरडा या औषधी वनस्पती तसेच अनेक दुर्मिळ बियांचा संग्रह आहे. यातील काही निवडक बियाणे लग्नाला येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना देऊन बीज संवर्धनासाठी हातभार लावण्याची कल्पना मी काकूंना बोलून दाखवली त्यांनी सुद्धा तत्काळ होकार देवून माफक दरामध्ये मला हादगा, आंबट-सुका, घोसावळी, दुधी भोपळा, शेवग्याचे बियाणे उपलब्ध करून दिले. विवाह समारंभाला आलेल्या ४०० वऱ्हाडींना आम्ही हे बियाणे भेट दिले. आणि काही दिवसातच त्याचा सकारात्मक प्रतिसाद देखील मिळला. "अगं तू दिलेल्या आंबट-सुक्याची आम्ही चार वेळा भाजी करून खाल्ली, हादग्याला  फुलं येयला सुरवात झालीये, घोसावळ्याचा वेल बराच फुलाय आत्ता....) असं अनेक नातेवाईक भेटल्यावर सांगतात. बऱ्याच जणांना घरातील ओला कचरा या भाज्यांच्या रोपांना वापरल्यामुळे ओल्या कचऱ्याचे निर्मूलन होयला देखील मदत झाली.
               आरोग्याच्या द्रुष्टीने आपल्या भोजनात सैंद्रिय भाज्यांचा समावेश असणे गरजेचे आहे. माझ्या छोट्याश्या प्रयत्नाला काही प्रमाणात यश मिळालय. असे काही हितकारक ट्रेंड झाल्यास मानव व निसर्ग यांचे नाते घट्ट होयला वेळ लागणार नाही. कारण आपल्याला निसर्गावर विजय मिळवायचा नसून त्याच्या साथीत, त्याच्या साखळीतला एक दुवा म्हणून जगायचं....

       मुक्ताफळ
( कु. मुक्ता भारत शिंदे.)

Wednesday 23 May 2018

सुपरमँन विश्रांतीवर जातोय....

              अगदी काल परवाची गोष्ट आहे. IPl च्या स्पर्धेतला रॉयल चेलेंजस् बंगळुरू VS हैदराबाद सामना. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हैदराबादचा अलेक्स हेल्स चौकार, षटकारांची अताषबाजी करत होता. मोईन अलीच्या चेंडूवर त्याने उंच फटका मारला बॉल बाऊंड्री पार करून प्रेक्षकात जाणार तोपर्यंत बाऊंड्रीवर असणारा एबी डी'व्हिलियस् हवेत उंच उडी मारतो आणि सिक्स जाणाऱ्या बॉलचा झेल बनवतो. क्षणभरासाठी प्रेक्षक आवक् होतात आणि पुढच्या क्षणी एबी च्या नावाचा जयघोष होतो.
                    मूळच्या दक्षिण अफ्रिकेच्या असलेल्या एबी चे चाहते जगभरात आहेत. खेळाडू पेक्षा माणूस म्हणून त्याच्यावर फिदा असलेले असंख्य चाहते आहेत. प्रत्यक्षात दिसायला हा सर्वसामान्य माणूस असला तरी त्याच्या अंगी असलेल्या विविध गुणांमुळे तो इतरांपेक्षा उठून दिसतो. त्याची ३६० डिग्री मध्ये चाललेली फटकेबाजी पाहून चाहते तृप्त होतात. एबी ने आत्तापर्यंत ११४ कसोटी सामन्यातून ८७६५ धावा तर २२८ एकदिवसीय सामन्यातून ९५७७ आणि ७८ टि- ट्वेंटी सामने खेळताना १६७२ धावा काढल्या आहेत. याशिवाय अनेक रेकॉर्ड्स त्याच्या नावावर आहेत.
                   आता तुम्ही म्हणाल हा क्रिकेट मधला बाप माणूस दिसतोय. पण फक्त क्रिकेटच नाही तर अनेक क्रीडाप्रकारांमध्ये एबी पारंगत आहे. क्रिकेट सोबतच त्याचा हॉकी, फुटबॉल, टेनिस, बँडमिंटन, रग्बी मध्ये देखील त्याचा नावलौकिक आहे. दक्षिण अफ्रीकेसाठी डेव्हीस कप जिंकणाऱ्या ज्युनियर टीमचा तो सदस्य होता. बँडमिंटन अंडर १९ गटात विजेता, ज्युनियर अँथलेटिक्समध्ये फास्टेस्ट १०० मीटरचा विक्रम तर शालेय जलतरण स्पर्धेत ६ विक्रम त्याच्या नावावर आहेत. हा पट्टया फक्त खेळातच हुशार नाही तर एका विज्ञान प्रयोगासाठी मंडेलांच्या हस्ते त्याला राष्ट्रीय स्तरावर मेडल मिळाल आहे. या सर्वात अजून भर म्हणजे तो संगीतकार आहे. उत्तम गातो, गिटार देखील वाजवतो. २०१० मध्ये त्याचा एक अल्बम ही रिलीज झाला आहे.
                    क्रिकेटच्या मैदानावर घोँगावणार हे वादळ आज पासून विश्रांतीवर गेलय. तरुणांना संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे अस म्हणत एबी ने क्रिकेट मधून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केलाय.त्याला मैदानावर पुन्हा खेळताना पाहता येणार नाही ही गोष्ट पचवणे त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच अवघड असेल.  असो क्रिकेट मधून आम्हाला एंटरटेन करण्यासाठी थँक्यु डी'व्हिलियस्....एक चांगला माणूस बनण्यासाठी तूझ्याकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत...
We will miss you..

- मुक्ताफळ
(कु.मुक्ता भारत शिंदे.)

Tuesday 13 February 2018

भटकंती कोल्हापूरची

           आम्हा काही समविचारी तरुणांना जीवनात चैतन्य हव आहे. काहीतरी वेगळं घडव ही आमची भूक. पण नक्की काय वेगळं घडव याच उत्तर आमच्याकडे नाही. जीवनात काहीतरी थ्रील असावं एवढ मात्र खरं.. हा थ्रील आम्हाला प्रवासातून मिळतो यावर आमच दुमत नाही.
                  कोल्हापूर शहराच  माझ्या मनात विशेष स्थान आहे. कदाचित इतिहासाच्या आवडीमुळे या करवीरनगरीच मला नेहमीच आकर्षण वाटत आलंय. हा तर, मी वर सांगितल्या प्रमाणे जीवनातला हा थ्रील अनुभवण्यासाठी आम्ही प्रवास करतो. या "आम्ही" मध्ये आता बऱ्याच जणांचा समावेश आहे. पण या कोल्हापूर सफारीसाठी इंदिरा, वैष्णवी आणि मुक्ता हे त्रिकुट पहिल्यांदाच एकत्र आलं. आदल्या रात्री plan ठरणं आमच्यासाठी नवीन नाही. तर दुसऱ्या दिवशी finally बऱ्याच वर्षांनी मी कोल्हापूरला निघाले. हिरव्यागार नेत्रसुखद वनश्रीचा आनंद घेत आम्ही कोल्हापूरला पोहचलो. एखाद्या ठिकाणी प्लॅनिंग करून जाण्यात तितकी मज्जा नाही. कोल्हापूरला पोहचलो तरी नक्की काय काय पहायच याबाबत आमची पाटी अजून कोरीच होती.
                पहिल्यांदा पेटपूजा करावी यावर आमच एकमत झालं आणि पावलं "गोकुळ"च्या दिशेने वळाली. कोल्हापूर मधल्या सुप्रसिद्ध हॉटेल्स पैकी गोकुळ एक. इथल्या दहीवडा आणि चमचमीत मिसळची लिज्जतच न्यारी.. पेटपूजा झाल्यावर आमचा मोर्चा "न्यू पॅलेस"कडे वळाला. राणी अहिल्याबाईंनी बांधलेला हा न्यू पॅलेस या करवीरनगरीच्या  इतिहासाची साक्ष देत आजही तितक्याच दिमाखात उभा आहे. अप्रतिम स्थापत्यशैलीचा नमुना असलेल्या या राजवाड्यामध्ये श्री.छत्रपती शाहू संग्रहालय आहे. या संग्रहालयामध्ये शस्त्रास्त्रे,दागदागिणे,सुशोभित वस्तूंपासून जुन्या वस्त्रांचा देखील संग्रह आहे. येथील हत्तीचे दालन हे अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. शाहू महराजांनी केलेल्या शिकारींचा मोठा संग्रह येथे आहे. वाघ, शिकारी कुत्री, सुस्त अस्वल, जंगली म्हैस, चित्ता, हिमालयातील अस्वल, हरणं असे अनेक मृत प्राणी येथे आहेत. राजवाड्याच्या मध्यभागी असलेला दरबार हॉल अतिशय अप्रतिम आहे. अत्यंत सुशोभित झुंबरांनी नटलेला हा दरबार हॉल पाहताना आपण हरखून जातो. आणि हाच तो क्षण अनुभवण्यासाठी आपण येथे आलो याचे समाधान देखील वाटते. राजवाड्याच्या सभोवताली असणार बगीचा देखील सुंदर आहे. कोल्हापूरवासियांनी आपल्या पूर्वजांच्या वास्तुंची व्यवस्थित जपवणूक केली आहे.
                 न्यू पॅलेस पाहून झाल्यावर आम्ही राजारामपूरी मध्ये जायला निघालो. या उपनगरामध्ये १८ गल्ल्या आहेत. विविध दुकानांनी नटलेला हा परिसर आहे. प्रसिद्ध मॉल्स, ज्वेलर्स, एलेक्ट्रिकची दुकाने येथे आहेत. जगप्रसिद्ध कोल्हापुरी खाद्यपदार्थांसाठी राजारामपूरी फेमस आहे. येथील नॅचरल आईस्क्रीम, दावणगिरी लोणी डोसा, राजाराम भेळ खाण्यासाठी खवय्ये नेहमी गर्दी करतात. आम्ही सुध्दा या पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतला. आणि महालक्ष्मी मंदिराकडे जाण्यास निघालो.
               महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले हे मंदिर उत्तम स्थापत्यशैलीचा सुरेख नमुना आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७००च्या काळात बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्याआधीचा शिलाहार राजानी सुमारे आठव्या शतकात केले असावे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पिदार कमानी असलेला, सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो. गेल्या दहा शतकात मंदिराची अनेकदा वाढ झालेली आहे. देवळाच्या भिंतीवर नर्तकी, वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रिया, मृदंग, टाळकरी, वीणावादी, यक्ष, अप्सरा, योध्दे कोरलेले आहेत. माघ शुध्द पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम, विनाचुन्याचे जोडीव-घडीव दगडी बांधकाम व नक्षत्रावर अनेक कोनाचा पाया ही मंदिराची वास्तू वैशिष्ट्ये आहेत. देवळाच्या निरनिराळ्या भागात चार देवनागरी शिलालेख कोरलेले दिसतात. महालक्ष्मी मंदिराच्या शेजारीच कोल्हापूर संस्थानाची कुलदेवी भवानी मातेचे मंदिर जुना राजवाड्याच्या चौकात शाहू छत्रपतींचा पूर्णाकृती लाकडी पुतळा आहे. पर्यटक मोठ्या संख्येने भवानी मंडपाला भेट देतात. मर्दानी खेळांचा सराव अनेकदा पर्यटकांसाठी येथे आयोजित केला जातो.
                मंदिर परिसरातील भटकंती झाल्यावर आम्ही कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेतला. (माझ्या सोबत असलेल्या 'प्राणीप्रेमी' इंदिरामुळे मला तांबड्या ,पांढऱ्या रश्याला मुकावे लागले.)
            आमच्या या कोल्हापूर सफारीचा शेवट रंकाळ्याच्या भेटीशिवाय अधूरा होता. तिन्हीसांजची वेळ हवेत सुखद जाणवणारा गारवा, आकाशातील रंगांची उधळण, अस्ताला जाणारा तो तांबूस सूर्य आणि समोर तो दूरवर पसरलेला रंकाळा... ह्या दृष्याचा आम्ही मनापासून निशब्द होऊन आनंद घेतला. साधारण संध्याकाळी ७ वाजता आम्ही परत सातारला यायला निघालो. खरी गंमत तर तेव्हा आली. सुट्टीचा दिवस असल्यामुळे एस.टी स्टँडवर तूफान गर्दी. बस काही लवकर मिळेना. दिवसभर फिरल्यामुळे पाय चांगलेच दुखत होते.आणि सभोवतालची गर्दी पाहून आपल्याला बसायला जागा मिळेल याची शाश्वती नव्हती. पण सुदैवाने या गर्दीत ढकला-ढकली करत आम्ही जागा मिळवण्यात यशस्वी झालो.
                चांदण्यांच्या प्रकाशात हेलकावे खात आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. गोष्टींमधील सौंदर्य नव्याने पाहण्यासाठी हा आमचा कोल्हापूरचा प्रवास अनिवार्यच होता. अनपेक्षितपणे काही प्रश्नांची उत्तरे मिळाल्याच समाधान मला या प्रवासानी दिलंय....

                                                   मुक्ताफळ
                                            (कु.मुक्ता भारत शिंदे.)

Wednesday 3 January 2018

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

प्रिय आई सावित्री,
             आज ३ जानेवरी तुझा जन्मदिवस. खरं तर हा दिवस थाटात साजरा होयला हवा पण दुर्दैव....

दीडशे वर्षापूर्वी अज्ञान, जातिभेद स्त्री-पुरुष भेदाभेद मिटवण्यासाठी १ जानेवरी १८४८ रोजी जोतिबांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्याकाळात मुलींना शिकणे व शिकवणे हे दोन्ही पाप मानले जात होते. पण जोतिबांनी तुला शिकवले आणि तू झालीस भारतातील पहिली महिला शिक्षिका.... त्याकाळात तुझ्यावर व जोतिबांवर आलेल्या परिस्थितीचा विचार करताना आजही अंगावर काटा येतो. पण तुम्ही मात्र त्या परिस्थितीला धैर्याने सामोरे गेलात. स्त्री-पुरुष समानता व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी चळवळ उभी करून तत्कालीन रुढी प्रिय समाजाला तू व जोतिबांनी कडवी झुंज दिली. तू जोतिबांना दिलेली साथ अजोडच होती. शिक्षिका, लेखिका, कवयत्रि, समाजसेविका अश्या विविध भूमिकेतून तू समाजातील दुर्बल घटकांसाठी लढत रहिलीस.
                    आज तुमच्यामुळेच स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात वावरत आहेत. आत्ता स्त्री-पुरुष समानता आली आहे. पण खरं सांगायच तर काही लोकांची संकुचित मानसिकता अजून तशीच दिसते.म्हणूनच आज महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर तुझा जन्मदिवस आम्हाला चार भिंतीच्या आत साजरा करावा लागला. शाहू ,फुले ,आंबेडकरांच्या विचारांचा वारसा चालवणारा हाच तो पुरोगामी महाराष्ट्र का ? असे प्रश्न पडायला लागलेत...
                   पण आम्ही तरूण मात्र या जातीपातीच्या राजकारणात अडकणार नाही. सामाजिक विषमता नष्ट करणे हेच आमचे उद्दिष्ट राहील. व त्याही पुढे जाऊन तुझ्या व जोतिबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र आम्ही सत्यात उतरवू.......

                      मुक्ताफळ
                (कु.मुक्ता भारत शिंदे)

जुनं ते सोनं : इतिहासाचा मौल्यवान खजिना

            काल बाथरूममधून पाणी पुढे जात नव्हतं. पाणी कुठे तरी chock up झालं असणार.. ड्रेनेज क्लीनिंग पावडर टाकून वैगेरे हा प्रश्न सुटेल असं...