Tuesday 13 February 2018

भटकंती कोल्हापूरची

           आम्हा काही समविचारी तरुणांना जीवनात चैतन्य हव आहे. काहीतरी वेगळं घडव ही आमची भूक. पण नक्की काय वेगळं घडव याच उत्तर आमच्याकडे नाही. जीवनात काहीतरी थ्रील असावं एवढ मात्र खरं.. हा थ्रील आम्हाला प्रवासातून मिळतो यावर आमच दुमत नाही.
                  कोल्हापूर शहराच  माझ्या मनात विशेष स्थान आहे. कदाचित इतिहासाच्या आवडीमुळे या करवीरनगरीच मला नेहमीच आकर्षण वाटत आलंय. हा तर, मी वर सांगितल्या प्रमाणे जीवनातला हा थ्रील अनुभवण्यासाठी आम्ही प्रवास करतो. या "आम्ही" मध्ये आता बऱ्याच जणांचा समावेश आहे. पण या कोल्हापूर सफारीसाठी इंदिरा, वैष्णवी आणि मुक्ता हे त्रिकुट पहिल्यांदाच एकत्र आलं. आदल्या रात्री plan ठरणं आमच्यासाठी नवीन नाही. तर दुसऱ्या दिवशी finally बऱ्याच वर्षांनी मी कोल्हापूरला निघाले. हिरव्यागार नेत्रसुखद वनश्रीचा आनंद घेत आम्ही कोल्हापूरला पोहचलो. एखाद्या ठिकाणी प्लॅनिंग करून जाण्यात तितकी मज्जा नाही. कोल्हापूरला पोहचलो तरी नक्की काय काय पहायच याबाबत आमची पाटी अजून कोरीच होती.
                पहिल्यांदा पेटपूजा करावी यावर आमच एकमत झालं आणि पावलं "गोकुळ"च्या दिशेने वळाली. कोल्हापूर मधल्या सुप्रसिद्ध हॉटेल्स पैकी गोकुळ एक. इथल्या दहीवडा आणि चमचमीत मिसळची लिज्जतच न्यारी.. पेटपूजा झाल्यावर आमचा मोर्चा "न्यू पॅलेस"कडे वळाला. राणी अहिल्याबाईंनी बांधलेला हा न्यू पॅलेस या करवीरनगरीच्या  इतिहासाची साक्ष देत आजही तितक्याच दिमाखात उभा आहे. अप्रतिम स्थापत्यशैलीचा नमुना असलेल्या या राजवाड्यामध्ये श्री.छत्रपती शाहू संग्रहालय आहे. या संग्रहालयामध्ये शस्त्रास्त्रे,दागदागिणे,सुशोभित वस्तूंपासून जुन्या वस्त्रांचा देखील संग्रह आहे. येथील हत्तीचे दालन हे अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. शाहू महराजांनी केलेल्या शिकारींचा मोठा संग्रह येथे आहे. वाघ, शिकारी कुत्री, सुस्त अस्वल, जंगली म्हैस, चित्ता, हिमालयातील अस्वल, हरणं असे अनेक मृत प्राणी येथे आहेत. राजवाड्याच्या मध्यभागी असलेला दरबार हॉल अतिशय अप्रतिम आहे. अत्यंत सुशोभित झुंबरांनी नटलेला हा दरबार हॉल पाहताना आपण हरखून जातो. आणि हाच तो क्षण अनुभवण्यासाठी आपण येथे आलो याचे समाधान देखील वाटते. राजवाड्याच्या सभोवताली असणार बगीचा देखील सुंदर आहे. कोल्हापूरवासियांनी आपल्या पूर्वजांच्या वास्तुंची व्यवस्थित जपवणूक केली आहे.
                 न्यू पॅलेस पाहून झाल्यावर आम्ही राजारामपूरी मध्ये जायला निघालो. या उपनगरामध्ये १८ गल्ल्या आहेत. विविध दुकानांनी नटलेला हा परिसर आहे. प्रसिद्ध मॉल्स, ज्वेलर्स, एलेक्ट्रिकची दुकाने येथे आहेत. जगप्रसिद्ध कोल्हापुरी खाद्यपदार्थांसाठी राजारामपूरी फेमस आहे. येथील नॅचरल आईस्क्रीम, दावणगिरी लोणी डोसा, राजाराम भेळ खाण्यासाठी खवय्ये नेहमी गर्दी करतात. आम्ही सुध्दा या पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतला. आणि महालक्ष्मी मंदिराकडे जाण्यास निघालो.
               महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले हे मंदिर उत्तम स्थापत्यशैलीचा सुरेख नमुना आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७००च्या काळात बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्याआधीचा शिलाहार राजानी सुमारे आठव्या शतकात केले असावे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पिदार कमानी असलेला, सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो. गेल्या दहा शतकात मंदिराची अनेकदा वाढ झालेली आहे. देवळाच्या भिंतीवर नर्तकी, वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रिया, मृदंग, टाळकरी, वीणावादी, यक्ष, अप्सरा, योध्दे कोरलेले आहेत. माघ शुध्द पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम, विनाचुन्याचे जोडीव-घडीव दगडी बांधकाम व नक्षत्रावर अनेक कोनाचा पाया ही मंदिराची वास्तू वैशिष्ट्ये आहेत. देवळाच्या निरनिराळ्या भागात चार देवनागरी शिलालेख कोरलेले दिसतात. महालक्ष्मी मंदिराच्या शेजारीच कोल्हापूर संस्थानाची कुलदेवी भवानी मातेचे मंदिर जुना राजवाड्याच्या चौकात शाहू छत्रपतींचा पूर्णाकृती लाकडी पुतळा आहे. पर्यटक मोठ्या संख्येने भवानी मंडपाला भेट देतात. मर्दानी खेळांचा सराव अनेकदा पर्यटकांसाठी येथे आयोजित केला जातो.
                मंदिर परिसरातील भटकंती झाल्यावर आम्ही कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेतला. (माझ्या सोबत असलेल्या 'प्राणीप्रेमी' इंदिरामुळे मला तांबड्या ,पांढऱ्या रश्याला मुकावे लागले.)
            आमच्या या कोल्हापूर सफारीचा शेवट रंकाळ्याच्या भेटीशिवाय अधूरा होता. तिन्हीसांजची वेळ हवेत सुखद जाणवणारा गारवा, आकाशातील रंगांची उधळण, अस्ताला जाणारा तो तांबूस सूर्य आणि समोर तो दूरवर पसरलेला रंकाळा... ह्या दृष्याचा आम्ही मनापासून निशब्द होऊन आनंद घेतला. साधारण संध्याकाळी ७ वाजता आम्ही परत सातारला यायला निघालो. खरी गंमत तर तेव्हा आली. सुट्टीचा दिवस असल्यामुळे एस.टी स्टँडवर तूफान गर्दी. बस काही लवकर मिळेना. दिवसभर फिरल्यामुळे पाय चांगलेच दुखत होते.आणि सभोवतालची गर्दी पाहून आपल्याला बसायला जागा मिळेल याची शाश्वती नव्हती. पण सुदैवाने या गर्दीत ढकला-ढकली करत आम्ही जागा मिळवण्यात यशस्वी झालो.
                चांदण्यांच्या प्रकाशात हेलकावे खात आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. गोष्टींमधील सौंदर्य नव्याने पाहण्यासाठी हा आमचा कोल्हापूरचा प्रवास अनिवार्यच होता. अनपेक्षितपणे काही प्रश्नांची उत्तरे मिळाल्याच समाधान मला या प्रवासानी दिलंय....

                                                   मुक्ताफळ
                                            (कु.मुक्ता भारत शिंदे.)

जुनं ते सोनं : इतिहासाचा मौल्यवान खजिना

            काल बाथरूममधून पाणी पुढे जात नव्हतं. पाणी कुठे तरी chock up झालं असणार.. ड्रेनेज क्लीनिंग पावडर टाकून वैगेरे हा प्रश्न सुटेल असं...