Tuesday 13 October 2020

जुनं ते सोनं : इतिहासाचा मौल्यवान खजिना

           काल बाथरूममधून पाणी पुढे जात नव्हतं. पाणी कुठे तरी chock up झालं असणार.. ड्रेनेज क्लीनिंग पावडर टाकून वैगेरे हा प्रश्न सुटेल असं वाटलेल. पण पुढे भलताच काही वाढून ठेवलेलं. कदाचित उंदीर, घुशींनी लॉकडाऊनचा काळ आमच्या ड्रेनेज पाइपमध्ये मस्त एन्जॉय केला होता. मस्तपैकी हातभार पाइप खाऊन त्यामध्ये छोटे दगड- गोटे, वाळू भरून त्यांनी बाथरूम आणि चेम्बर यांचा संपर्कच तोडून टाकला होता. एवढ्यावरच ते शांत बसले नाहीत तर त्यांनी किचन सिंक मध्ये सुद्धा त्यांनी हाच पराक्रम गाजवला होता.त्यांच्या चुका पोटात घेण्याशिवाय दुसरा पर्याय आमच्याकडे नव्हता. या ड्रेनेजच्या गोंधळात मी फ्लॅशबॅक मध्ये गेले. कारण ड्रेनेज हा काय आधुनिक मानवाने लावलेला शोध नाही. तर सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी आजच्या स्मार्ट सिटीला टक्कर देतील अशी संस्कृती, नगररचना अस्तित्वात होती. या नगररचनेतील अनेक प्रमुख वैशिष्ट्यंपैकी एक म्हणजे सांडपाणी व पाऊसाचे पाणी शहराबाहेर वाहून नेहण्यासाठी एक मीटर खोल भुयारी गटारांची केलेली निर्मिती. हि गटारे दगड आणि पक्क्या विटांनी बांधलेली होती. हडप्पन लोकांना चांगलेच ठाऊक होते कि अश्या नाले, गटारी उघडे ठेऊ नयेत. संपूर्ण ड्रेनेज सिस्टीम, नाले विटा आणि दगडांनी झाकून ठेवण्यात आले होते. आणि तपासणीसाठी नियमित अंतराने तपासणी सापळे तयार करण्यात आले होते. हे सर्व आठवण्याचं निम्मित असं.. कि,काही दिवसांपूर्वीच या संस्कृतीतल्या एका शहराला प्रत्यक्ष भेट देण्याची संधी मला मिळाली. 
            मी पहाटे चार वाजताच उठले. कारण आम्हाला जवळपास ५००किमी प्रवास करायचा होता. आजपर्यंत मी ज्या जागेबद्दल केवळ पुस्तकातून शिकत होते. त्याला प्रत्यक्षात भेट देण्यासाठी मी कमालीची उत्सुक होते. पण या हडप्पन शहराला भेट देतानाच रस्त्यातील "मोधेराच सूर्य मंदिर" आणि जागतिक वारसा स्थळ असलेली "राणी की वाव" आम्हाला साद घालत होती. पुष्पावती नदीच्या काठावर वसलेले मेहसना जिल्यातील मोढेराचे सूर्य मंदिर हे गुजरातमधील मंदिर वास्तूकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हे मंदिर सोलंकी राजा भीमदेव प्रथमच्या कारकिर्दीत बांधले गेले. या जागेचा उल्लेख स्कंद पुराणात भास्कर प्रदेश असा आहे. हे मंदिर तीन विभक्त घटकांचे एकत्रीकरण आहे. ते म्हणजे गुधामंडप (मुख्य मंदिर), सभा मंडप आणि कुंड (जलाशय). मंडपाच्या बाह्य भाग आणि स्तंभांना अतिशय कोरीव काम करून सुशोभित केले आहे. कुंडाच्या पायथ्याशी पायऱ्या आहेत. आणि काही छोटी मंदिरेही आहेत. सभामंडपात ५२ स्तंभ आहेत. या स्तंभांवर वेगवेगळ्या देवी-देवतांची शिल्पे आहेत. त्याव्यतिरिक्त आतील बाजूस रामायण आणि महाभारतातील प्रसंगांना उत्कृष्ट कारागिरी करून दर्शवण्यात आले आहे. या स्तंभांना खालच्या दिशेने बघितल्यास ते अष्टकोनी दिसतात तर वरच्या बाजूने बघितल्यास गोलाकार दिसतात. सभामंडपानंतर गुधमंडप व गर्भगृह आहे. जेथे सूर्यदेवाच्या बारा प्रतिमा रेखाटल्या आहेत. गुधमंडप आणि गर्भगृहाच्या मध्ये अंतराल आहे. गर्भगृहामध्ये कोणतीही प्रतिमा स्थापन केलेली नाही. मोधेराच्या सूर्य मंदिरामध्ये ब्रह्मा, शेषशायी विष्णू, विष्णूचे विभिन्न अवतार त्यामध्ये वराह, त्रिविक्रम, नरसिंह इत्यादी. काही शिल्पे शैव पंथाचे प्रतिनिधित्व करणारी आहेत, त्यामध्ये उमा महेश्वर, नृत्य करणारा गणेश तसेच दुर्गा आणि सप्तमातृका यांची शिल्पे आहेत. गर्भगृहाच्या बाहेरील भिंतींवर आदित्य, अष्टदिक्पालचे फलक, गौरीची विभिन्न रूपे,नृत्य करणाऱ्या अप्सरा, वाद्य वाजवणारे अशी अनेक शिल्पे रेखाटली आहेत. चालुक्यन शैलीतील मोढेराचे सूर्य मंदिर स्थापत्यशैलीचा आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
            मोधेरा सूर्य मंदिरापासून जवळच "राणी की वाव" हे जागतिक वारसा स्थळ आहे. पाटण गावातील सरस्वती नदीच्या काठावर वसलेली ही पायऱ्यांची विहीर पाण्याचे महत्व अधोरेखित करणारी स्थापत्य कलेचे एक सर्वोत्तम उदाहरण आहे. ही पायऱ्यांची विहीर सातमजल्यांमध्ये विभागली गेली असून त्यामध्ये ५० हुन अधिक मुख्य शिल्पे असून एक हजार हुन अधिक लहान धार्मिक व पौराणिक प्रतिमा आहेत. या विहिरीचे बांधकाम सौराष्ट्राच्या खनगाराची मुलगी व ११व्या शतकातील सोलंकी घराण्याची राणी म्हणजेच भीम पहिला याची पत्नी "उद्यमती" हिने केले. पुढे नजीकच्या काळात शेजारील सरस्वती नदीमुळे हि विहीर पाण्याखाली गेली होती. १८९० मध्ये हेन्री कउन्स आणि जेम्स बर्गेस यांनी या जागेला भेट दिली तेव्हा हि विहीर पाण्याखाली गाडलेली होती. १९८६ ला ASI ने (Archaeological Survey of India) या ठिकाणी मोठे उत्खलन केले व या विहिरीचा जीर्णोद्धार केला. या उत्खलनात त्यांना राणी उद्यमतीची प्रतिमा देखील मिळाली आहे. या विहरीची रचना जमिनीखालील मंदिर अशी आहे. यातील शिल्पांमध्ये ब्रह्मा, विष्णू, शिव, देवी, गणेश, कुबेर,लकुलीशा, भैरव, सूर्य, इंद्र यांच्यासह अनेक हिंदू देवतांचे चित्रण आहे. विष्णूची चोवीस रूपे तसेच विष्णूचे दशावतार यांचाहि त्यात समावेश आहे. ब्रह्मा- सावित्री, उमा- महेश्वर आणि लक्ष्मी- नारायण या देवतांची शिल्पे येथे आहेत. अन्य उल्लेखनीय शिल्पांमध्ये अर्धनिश्वर तसेच लक्ष्मी, पार्वती,सरस्वती, चामुंडा, दुर्गा, वीस हात असलेली महिषासुरमर्दिनी क्षेंमकरी, सूर्यनी आणि सप्तमातृका यांची शिल्पे मोठ्या संख्येने आहेत. नऊ ग्रहांच्या प्रतिमा देखील येथे आढळतात. येथे मोठ्या संख्येने अप्सरांची शिल्पे आहेत. ती कामुक हेतू दर्शवतात. स्त्रियांच्या दैनंदिन जीवनाचे दर्शन घडवणारी काही शिल्पे आहेत. त्यांच्यात विविध प्रकारच्या भावभावना चित्रित केल्या आहेत. याशिवाय विहरीत खांबांना सजावट म्हणून घोडे, हत्ती, सिंह या प्राण्यांच्या आकृतीचा वापर केला आहे. भिंतींना भौमितीय जाळीचे नमुने आणि पटोला वस्त्रोद्योगासारखी सजावट केली आहे. या शिल्पांमधील बारकावे पाहताना आपण खरोखरच त्यामध्ये रमून जातो.
               आता आम्ही आमच्या डेस्टिनेशन पॉईंटला निघालो. ज्याच्यासाठी इतका सारा घाट घातला होता. आम्हाला अजूनही जवळपास सहा- साडेसहा तासांचा प्रवास करायचा होता. "कच्छ" पांढऱ्या वाळवंटासाठी म्हणजेच मिठाच्या वाळवंटासाठी प्रसिद्ध असलेल. तसेच येथील हस्तकलेतून बनवलेल्या शोभेच्या वस्तूंना देखील अख्या भारतातून मागणी असते. आम्ही कच्छमधल्या रापर गावात जेवण केल. नॉनव्हेज खाणाऱ्या माणसाला गुजरातमधील जेवणाशी जुळून घ्याव लागत. असो. आम्ही आता खादीर बेटावर प्रवेश केला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेला पांढरा शुभ्र मिठाचा सडा.. त्या नयनरम्य दृश्याचा आम्ही मनापासून आनंद घेत होतो. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रन ऑफ कच्छचा तलाव भरलेला होता. लालबुंद चोच, लांबसडक मान, उंच असणारे पाय असे ज्याचे लोभस रूप असते त्या "फ्लेमिंगो" पक्षांचे थवेच्या थवे आम्हाला रन ऑफ कच्छच्या तलावात दिसले. पाण्यामधल्या त्याच्या शिस्तबद्ध हालचाली नेत्रसुखद होत्या. दिवसभराच्या प्रवासानंतर आम्ही आमच्या डेस्टिनेशन पॉईंटला पोहचलो. 
              "धोलावीरा" आजच्या घडीला कच्छच्या वाळवंटाकडे एक कोरडवाहू प्रदेश म्हणून पाहिलं जात. पण सुमारे ४५०० वर्षांपूर्वी येथे १२०० वर्षे एक संपन्न महानगर अस्तित्वात होते. सिंधू संस्कृतीतल्या लोकांनी वाळवंटात एका आधुनिक शहराची निर्मिती केली. धोलाविरा त्या लोकांसाठी खूप महत्त्वाचं होतं. कारण, या शहरानं पुढे आंतरराष्ट्रीय बंदराची भूमिका बजावली. त्यावेळेची भॊगोलोक परिस्थिती आजपेक्षा नक्कीच वेगळी होती. पण कच्छच्या वाळवंटी प्रदेशाला आणि हवामानाला धोलावीरातील नागरिकांनी अत्यंत चातुर्याने हाताळले होते. या जागेचा शोध १९६७-६८ मध्ये प्रा.जे.पी.जोशी यांनी लावला होता. ज्याप्रदेशातील काही महिने, वर्षे पाऊसाविना असतात त्या खादिर बेटावरील धोलावीरा शहर मात्र पाणीच नव्हे तर सर्वच बाबतीत सुफळ संपूर्ण होत.
               या शहराचे प्रमुख आधारस्तंभ म्हणजे उत्तरेला असणारा मानसर कालवा आणि आणि दक्षिणेला असणारा मनहार कालवा होय. धोलावीराच वैशिष्टय म्हणजे जलवाहिन्या व जलाशयांची अत्याधुनिक जलसंधारण व्यवस्था ज्याच संपूर्ण बांधकाम हे दगडांच आहे. या शहरात मोठ्या प्रमाणात जलाशय होते. त्यातील तीन भाग उघडकीस आले आहेत. ते पाऊसाने आणलेले गोडे पाणी साठवण्यासाठी किंव्हा जवळील दोन कालव्यावरून वळवलेल्या पाण्याचा साठा करण्यासाठी वापरले जात होते. सांडपाणी वाहून नेहण्यासाठी दगडी नाले बनवण्यात आले होते. उपलब्द पाण्याचा प्रत्येक थेंब साठवण्यासाठी तयार करण्यात आलेली विस्तीर्ण पाणी व्यवस्थापन प्रणाली हवामानातील जलद बदलांच्या विरोधात टिकून राहण्यासाठी लोकांनी योजलेले उपाय दाखवते. पाण्याच्या साठवणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या दगडांच्या विहिरी हे देखील डोलावीराचे एक वैशिष्ट्य आहे. शहरातील किल्या (Citadel) मध्ये सर्वात लक्षवेधक दगडांची विहीर सापडली आहे. धोलावीराच्या विस्तृत जलसंधारणाच्या पद्धती अद्वितीय आहेत. आणि प्राचीन जगाच्या सर्वात कार्यक्षम प्रणालींपैकी एक आहेत.
              इतर हडप्पन शहरे पक्क्या विटांनी बांधली गेली आहेत. मात्र धोलावीराचे वैशिष्ट्य म्हणजे ते चौरस आणि आयताकृती दगडांनी बांधले गेले होते. जे दगड जवळच्याच खाणीतून उपलब्द होत होते. धोलावीरा शहर मातीच्या विटांनी बांधलेल्या बाह्य तटबंदीने बंदिस्त होते त्यावर होते दगडी बुरुज आणि दोन प्रमुख उत्तर व दक्षिणेकडील भिंतींच्या मध्यभागी प्रवेशद्वार. धोलावीरा तत्कालीन शहराचे वेगवेगळे भाग ओळखले गेले आहेत. त्यामध्ये एक छोटासा वाडा परिसर होता. त्याच्या पश्चिमेस बेली परिसर होता आणि उत्तरेस मोठे मधले शहर (Middle Town) व पूर्वेला खालचे शहर (Lower Town) या सर्वांच्या स्वतःच्या बंदिस्त भिंती होत्या. धोलावीराच मधले शहर हे ३६०×२५० मी भिंतींनी वेढलेले होते. शहराचा मधला भाग आणि सिटॅडल हा संरक्षण कार्य, अंगभूत क्षेत्र, रस्ता व्यवस्था, विहिरी आणि मोठ्या मोकळ्या जागेसह सुसज्ज होता. शहरातील सिटॅडल हे संपूर्णपणे तटबंदीचे आणि गुंतागुंतीचे क्षेत्र होते. शहरातील भव्य किल्लेवजा वाडा हा दुहेरी तटबंदीने संरक्षित होता. शहरातील महत्वाचे लोक बेली परिसरात राहत. किल्ला-बेली आणि मधल्या शहरादरम्यान एक मोठा खुला परिसर आहे त्याची ओळख स्टेडियम अशी झाली आहे. जे कदाचित विशिष्ठ औपचारिक प्रसंगी वापरले गेले असेल. खालच्या शहरात काही घरांचे अवशेष सापडतात. सोबतच त्याठिकाणी मणी, शिंपले, मातीची भांडी घडवणारे यासारखे यासारख्या हस्तकला उदयोगांचे अवशेष सापडतात. 
                 शहराच्या बाहेरील भागात स्मशानभूमीचे अवशेष दिसतात. धोलाविरामध्ये एक विशाल वर्तुळाकार रचना मिळाली आहे. हि रचना म्हणजेच एखादी कबर किंव्हा स्मारक असल्याचे मानले जाते. परंतू याठिकाणी कोणतेही मानवी सांगाडे किंव्हा इतर अवशेष मिळाले नाहीत. या रचनेत दहा रेडियल चिखल-विटांच्या भिंती आहेत ज्या एका स्पोकल व्हीलच्या आकारात बांधल्या आहेत. धोलावीरा शहरातील सर्वात महत्वाचा शोध म्हणजे उत्तरेच्या प्रवेशद्वारा शेजारील एका खोली मध्ये सापडलेला साइनबोर्ड होय. दहा चिन्हे असलेला हा साइनबोर्ड एका लाकडी फळीवर लिहलेला आहे. त्यावरील चिन्हे जिप्सम खनिजापासून तयार केली आहेत. त्यातील लाकूड कुजले आहे मात्र त्यावरील चिन्हे अजूनही सुस्थितीत आहेत.धोलावीराच्या उत्खननातून मिळालेल्या अनेक वस्तू येथील संग्रहालयात ठेवल्या आहेत. संग्रहालयात प्रवेश करतानाच आपल्याला धोलावीरा साइनबोर्डची तयार केलेली प्रतिमा दिसून येते. उत्खननात सापडलेली खापराच्या भांडी, चौकोनी मातीचे शिक्के, स्तंभिका, बांगड्या, मातीपासून बनवलेल्या प्राण्यांच्या मूर्ती, जीवाष्म, मातीचे केक, चाके, वजन मोजमापे आणि दगडी हत्यारे अश्या अनेक वस्तूंचे संकलन या संग्रहालयात केले आहे. तांब्यापासून बनवलेली अंगठी, दागिने आणि बाण देखील आपल्याला पहायला मिळतात.
                     एखाद्या गोष्टीचा आपण खूप आटापिटा करतो आणि जेव्हा फायनली ती गोष्ट आपल्यासमोर येते,आपण तिचा आनंद घेत असतो तेव्हा झर्रकन डोळ्यासमोरून ती मिळवण्यासाठी केलेला खटाटोप आठवतो. सातारा ते धोलावीरा हजार मैलाचा प्रवास.. किती सुखद अनुभव दिले मला या प्रवासानी... त्याचीच उजळणी करता आता आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. 
                                                                                                                              - मुक्ताफळ

                                                                                                                        (कु. मुक्ता भारत शिंदे.)
मोधेराच सूर्य मंदिर  


राणी की वाव 



उत्तरेचे प्रवेशद्वार धोलावीरा 


पूर्वेचे प्रवेशद्वार धोलावीरा 



ढोलाविराच्या उत्तरेकडील गेटवरील ढोलाविरा साइनबोर्ड 



पायऱ्या असणारा जलसाठा धोलावीरा

8 comments:

  1. भारी मुक्ता जी.👌👍☺️

    ReplyDelete
  2. छानच 'मुक्ता'फळं

    ReplyDelete
  3. खूप छान मुक्ता

    ReplyDelete
  4. अप्रतिम लेखन मुक्ता अशीच पुढे जात रहा😊😊👍👍

    ReplyDelete
  5. मस्त लेखन सुंदर सादरीकरण...

    ReplyDelete

जुनं ते सोनं : इतिहासाचा मौल्यवान खजिना

            काल बाथरूममधून पाणी पुढे जात नव्हतं. पाणी कुठे तरी chock up झालं असणार.. ड्रेनेज क्लीनिंग पावडर टाकून वैगेरे हा प्रश्न सुटेल असं...