Wednesday 2 October 2019

.....म्हणूनच ग्रेटा तू खरोखरच ग्रेट आहेस.

                   "आमच्या अंगावर पोकळ शब्द फेकून तुम्ही आमची स्वप्न आमचं बालपण हिरावून घेतलंय. आणि तरी सुद्धा मी भाग्यवंतांपैकी एक आहे. कारण लोक त्रस्त आहेत, जीवनमरणाच्या उंबरठ्यावर आहेत, संपूर्ण भवतालच कोसळत चालय. आम्ही नामशेष होण्याच्या मार्गावर आहोत. आणि तुम्ही कश्याच गुणगान गाताय... आर्थिक उलाढाल आणि पैसा..? या परिकथे मध्ये तुम्ही रमताय...! तुमची हिम्मतच कशी होते....??" एका सोळा वर्षाच्या मुलीने असा प्रश्न केल्यामुळे हवामान परिषदेतील नेते निर्रुतर झालेत. 
                     ग्रेटा थनबर्ग राइट लाइव्हलीहूड या पर्यायी नोबेल पुरस्काराची विजेता... गेल्या वर्षी शाळा बुडून स्वीडनच्या संसदेबाहेर "जर भविष्यच नसेल तर शिकायचं कश्यासाठी?" असा आर्त टाहो तिनी फोडला होता. वाढत्या ऊर्जा वापरामुळे वाढत असलेल्या कार्बन उत्सर्जनामुळे पृथ्वी तापतेय आणि या जागतिक तापमानवाढीचे दुष्परिणाम हवामान बदलाच्या रूपाने दिसू लागलेत. ग्रेटाने हवामान बदलाच्या मुद्द्यावर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. 
                    आज राष्ट्रीय पर्यावरणीय आणीबाणी जाहीर करण्यासारखी परिस्थिती का निर्माण झाली? विकासाच्या नावाखाली विकसित देशांची पर्यावरणाला घातक असलेली आडमुठी धोरणे, विकसनशील देशांची विकासाबाबतची हाव आणि अविकसित देशांची जीवनावश्यक गरज पूर्ण करताना होणारी घुटमळ.. या सर्वांमध्ये विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. हे कुठे तरी थांबायला हवं.. जसा पर्यावरण रक्षणाचा अट्टहास आहे तसा शाश्वत विकास देखील गरजेचा आहे. म्हणजे विकास आणि पर्यावरण निवडताना यापैकी कोणाचा तरी बळी जाणारच... पण हा शाश्वत विकास आपल्याला पर्यावरणाला सोबत घेऊन करता आला तर....! याकरिताच ग्रेटाने " FRIDAY FOR FUTURE " हि मोहीम उघडलीये.तिच्या या मोहिमेला जगभरातून पाठिंबा मिळतोय. ग्रेटाने स्वीडनच्या राजकारण्यांना, “मी माझ्या मनामध्ये जी भीती घेऊन जगतेय ती भीती जेव्हा तुमची झोप उडवेल तेव्हा तुम्ही वातावरणबदलाविरोधात पावले उचलाल. मला तुम्हाला माझ्या मनातील भीतीशी ओळख करून द्यायची आहे.” असं तिने ठणकावून सांगितलं होतं. कोणतीही गोष्ट आधी स्वतः करा मग लोकांना सांगा, या उक्ती प्रमाणे ग्रेटाने याची सुरवात स्वतःच्या घरापासून केलीये. हवामान बदलाच्या परिषदेसाठी पंधरा तासांचा सागरी प्रवास करून ती हजर झाली. दैनंदिन जीवनातील काही सवयी ज्या पर्यावरणाला घातक आहेत त्या कमी करून पर्यावरण वाचवण्यासाठी आपण हातभार लावू शकतो हे तिनी दाखून दिलंय.                            
                   महात्मा गांधीनी सांगितलेली ग्रामविकासावर आधारित जीवनशैली यासाठीचा आदर्श आहे. पर्यावरणाच्या सानिध्यातील जीवनशैली आत्मसात करणे ही आजच्या काळाची गरज आहे. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जिथे लोकांना आपल्या दोन वेळेच्या जेवणाची चिंता आहे. तिथे पर्यावरणला दुय्यम स्थान मिळाले तर नवल वाटण्याचे कारण नाही. पण उद्याच्या शाश्वत भविष्यासाठी पर्यावरणाला सोबत घेऊन त्याच्या साखळीतला एक दुवा म्हणून जगायचय आपल्याला... यासाठी ग्रेटाने उघडलेली ही मोहीम कौतुकास्पदच आहे. एका सोळा वर्षाच्या मुलीने मोठ्यांनी देखील लहानांकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत हे दाखून दिलंय....म्हणूनच ग्रेटा तू खरोखरच ग्रेट आहेस. 

                                                          -  मुक्ताफळ 
                                                     (कु.मुक्ता भारत शिंदे.)
 

3 comments:

जुनं ते सोनं : इतिहासाचा मौल्यवान खजिना

            काल बाथरूममधून पाणी पुढे जात नव्हतं. पाणी कुठे तरी chock up झालं असणार.. ड्रेनेज क्लीनिंग पावडर टाकून वैगेरे हा प्रश्न सुटेल असं...