Thursday 9 August 2018

मन धागा धागा जोडते नवा नवा...


                त्याच आणि माझ सोयरीक कधी जुळलच नव्हतं. त्याची अवेळी येण्याची सवय, वाट पाहिला लावणं आणि मनमानी कारभार यामुळे मी काहीशी खट्टूच होते त्याच्याशी. त्या दिवशी सुद्धा तो नेहमी सारखाच अचानक आला. ( एव्हाना मला आत्ता त्याच्या अवेळी येण्याची सवय झालीये.) त्यादिवशी मात्र मी वैतागलेच जरा. त्याच्या या मस्तीखोरपणामुळे माझ्या पुढच्या प्लानची वाट लागणार होती.
                   त्याच्या अश्या अवेळी येण्यानी सगळ्यांचीच धावपळ उडाली  होती. तो काही एकटा आला नव्हता  नेहमी स्वतःच्या धुंदीत राहणाऱ्या, डोळ्याला न दिसणाऱ्या पण स्पर्शाने स्वतः च अस्तित्व दाखवणाऱ्या त्याच्या दोस्ताला घेऊन तो हजर झाला. तो भेटतो असा की काही वेळ जीव गुदमरून जावा आणि नाही भेटत तेव्हा असा की त्याच्या भेटी अभावी जीव कासावीस व्हावा. त्या दिवशी मात्र मी ठरवलं आपणच थोडं समजूतदारपणाने घेऊया. दोन क्षण त्याच्या सोबतीने घालवूया.. त्याच्या सोबत राजारामपुरी मध्ये भटकायचं या कल्पनेने मी रोमांचित झाले. कित्येक वर्षांनंतर त्याच्या सरींना मी मनमोकळेपणाने झेललं होत. त्याच्या बद्दलचा सगळा रुसवा आत्ता विरून गेला होता. चंचल धावणाऱ्या मनाला आणि विचारांना आत्ता विसाव्याची गरज होती. आपोआप पाऊलं हिंदुस्थान बेकारीकडे वळली. वाफळलेल्या कॉफीचे घोट घेताना किती तरी दिवसात जिची भेटच पडत नव्हती ती "शांती" भेटली.
                या अश्या वातावरणात रंकाळा गाठायचा विचार मनात चमकला. मग काय या सुंदर वातावरणातील रंकाळ्याचा नजराणा पाहण्यासाठी स्वारी व्याकुळ झाली. धावतच एका रिक्षावाल्याला गाठलं. वरून "वरूणराजा" बरसतोय, रस्त्यावर लाईट नाही अश्या वेळेस रंकाळ्यावर काय काम असे हावभाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. थोडीफार घासाघाशी करून मी त्याला  येण्यासाठी तयार केलं. रंकाळा माझ्या आवडीच ठिकाण.. इथं आल्यावर खूप शांत वाटत. मनातल्या विचारांच्या थैमानाला आवर घालून आपल्या सौंदर्याच्या प्रेमात पाडण्याची कला रंकाळ्यात आहे.
                 आजूबाजूच्या लोकांच भान आत्ता मला नव्हतं. रंकाळ्यानी मला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेतल होत आणि मी ही वाहवत गेले...

                            मुक्ताफळ
                    (कु.मुक्ता भारत शिंदे.)

जुनं ते सोनं : इतिहासाचा मौल्यवान खजिना

            काल बाथरूममधून पाणी पुढे जात नव्हतं. पाणी कुठे तरी chock up झालं असणार.. ड्रेनेज क्लीनिंग पावडर टाकून वैगेरे हा प्रश्न सुटेल असं...