Monday 9 March 2020

सुरवात नव्या पर्वाची...!

                         खूप प्रवास बाकी आहे असं म्हणत स.प.महाविद्यलयाचा निरोप घेतला होता.डेक्कन कॉलेजला ऍडमिशन मिळालं आणि या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली. Archaeology ला आल्यानंतर सुरवातीला हे सगळं मला झेपेल का नाही असं वाटत होत.नवीन विषय आणि सभोतालच्या वातावरणामुळे मी काहीशी भांबावून गेले होते. पण लवकरच या मध्ये रमले सुद्धा... कोणत्याही Archaeologist साठी एखाद्या site ला भेट देणे यातील आनंद काही औरच असतो.काही दिवसांपूर्वीच हा आनंद मी प्रत्यक्ष अनुभवला. सुट्टीच निम्मित साधून आम्ही मैत्रिणींनी उस्मानाबाद मधील तेर गावाला भेट देण्याचा बेत आखला.
                         फक्त प्लॅन ठरवून शांत न बसता.त्याच रात्री उस्मानाबादला निघायचं ठरवलं.एका दिवसात ट्रेनच बुकिंग मिळणं शक्य नव्हतं, त्यामुळे एस.टी महामंडळाचा पर्याय स्वीकारला. रात्री साडे दहाच्या बसच बुकिंग केलं जेणेकरून आम्ही रात्रीचा प्रवास करून पहाटे पर्यंत उस्मानाबादला पोहचू.मी आणि माझ्या उत्साही मैत्रिणी साडे दहा वाजता शिवाजीनगरला पोहचलो. अर्धा तास झाला तरी बस काही येईना म्हंटल्यावर काहीतरी गडबड असल्याचं आमच्या लक्षात आलं. चौकशी केंद्रावर चौकशी केल्यानंतर सगळा घोळ लक्षात आला. आम्ही ज्या गाडीची साडे दहा वाजल्यापासून वाट पाहत होतो. ती गाडी साडे दहा वाजता पनवेलहुन सुटणार होती. म्हणजेच तिला पुण्यात पोहचायला एक- दीड वाजणार होता. अरेरे... म्हणजे तब्बल दोन- अडीच तास गाडीची वाट पाहण्याशिवाय कोणताही पर्याय आमच्याकडे नव्हता. आमच्या सळसळत्या उत्साहावर एव्हाना विरजण पडल होत. पण शांत बसू ते आम्ही Archaeologist कसले..! Archaeology मधले प्रश्न आणि उत्तरे हा आमचा खेळ सुरु झाला. प्रवासात असावीत म्हणून घेतलेली चिप्सची पाकीट पुण्यातच उघडली गेली होती. हसत खिदळत दोन- अडीच तास निघून गेले. साधारण दीड वाजता आमची बस आली आणि पुणे- उस्मानाबाद प्रवासाला सुरवात झाली. इतक्यावेळ ताटकळ पडल्यामुळे आम्ही सगळेच पेंगाळलेले होतो.गप्पांचा पूर मात्र अजूनही ओसरलेला नव्हता. पण आजूबाजूच्या जनतेचं भान ठेवत आम्ही झोपण्याचा निर्णय घेतला. साडे सहा वाजता आम्ही उस्मानाबादला पोहचलो. जवळच्याच एका लॉजमध्ये आवराआवरी करून आमची स्वारी आता उस्मानाबाद ते तेर या प्रवासासाठी सज्ज झाली. पुन्हा लालपरीच्या मदतीने आम्ही तेर पर्यंत पोहचलो.आता सर्वप्रथम पेटपूजा करावी यावर आमचं एक मत झालं.
            उस्मानाबादपासून १८ किमी वर वसलेल्या तेर गावाला शेकडो वर्षांपासूनचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. 'पेरिप्लस ऑफ इथेरियन सी' या प्रवासवर्णनात बॅरिगाझा (गुजरातमधील भरूच) पासून २० दिवसांच्या प्रवासाने पैठण येते. पैठणपासून पूर्वेस दहा दिवस प्रवास केल्यानंतर तगरला पोहचता येते असं सांगितलं आहे. हे प्राचीन तगर म्हणजेच आजच्या काळातील तेर होय. तेर गाव पांढऱ्या मातीच्या टेकाडावर वसलेले आहे. तेरणा नदीच्या दोन्ही बाजूला अनेक पांढरीची टेकाडे आपल्या उदरात पूर्वजांच्या वैभवशाली वारशाच्या पाऊलखुणा सामावून स्थित आहेत. महार, कोट,मुलांनी,रेणुका,बैराग, सुलेमान,काझी,गोदावरी या टेकड्या आजही तेरच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात.पुरातत्वज्ञ एखादी विशिष्ट जागा उत्खलनासाठी कशी निवडतात असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. आज जश्या अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरज आहेत.



त्याच प्रमाणे प्राचीनकाळी पाणी ही मानवाची अत्यंत महत्वाची गरज होती. ज्याठिकाणी पाण्याची उपलब्द्ता असे अश्या ठिकाणी मानव वस्ती करून राहत असे. प्राचीन काळी बहुतांश घरेही मातीने बांधली जात. अश्या वस्त्या एकावर एक झाल्याने कालांतराने वस्त्यांच्या पडझडीमुळे त्या अवशेषांचे एक पांढरीचे टेकाड निर्माण होते. शेतातील काळ्या व इतर करड्या मातीपेक्षा या पांढरीच्या टेकाडाच्या रंग वेगळा असतो. पांढरीचे टेकाड याचाच अर्थ प्राचीन वस्तीचे अवशेष असलेले टेकाड होय. या तेरच्या उदरात इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडातील पुरावशेष दडलेले आहेत. तेर मध्ये पुरातत्व खात्याची आत्ता पर्यंत आठ उत्खलने झालेली आहेत. प्राचीन काळात तगरला उपराजधानीचा दर्जा होता. ज्याप्रमाणे प्रतिष्ठान (पैठण) हे सातवाहनांच्या काळात भरभराटीला आले होते त्याचप्रमाणे तेर देखील सातवाहनांच्या काळात दक्षिणपथावरील प्रमुख व्यापार केंद्र बनलेले होते.तेर येथील उत्खलनात सर्वात खालच्या थरात सापडलेल्या गुळगुळीत दगडी हत्यारावरून येथील नवषमयुगात देखील मानवी वस्ती होती असा अंदाज बांधता येतो. (इ.स.पु.९५००-९०००). बौद्ध वाङ्मयात उल्लेखलेल्या षोडस महाजनपदांपैकी अश्मक व मूलक ही जनपदे मराठवाड्यात होती. त्यापैकी तगरचे स्थान अश्मक जानपद होते.(इ.स.पु.६००). तगरचा सर्वात प्राचीन उल्लेख सांची स्तूपावरील कोरीव लेखात 'ताकारपद' असा आढळतो. मौर्यकालीन (इ.स.पु.3००-2००) नाणी व NBP उत्खलनात सापडल्यामुळे मौर्याकालीन तगरची भूमिका स्पष्ट होते.
                            या सर्व कालखंडामध्ये सातवाहन कालीन तेरचा पुरातत्वीय वारसा महत्वाचा ठरतो. टॉलेमी या ग्रीक ग्रंथकाराने दक्षिणेतील कापड उत्पादनातील प्रमुख केंद्र म्हणून तगरचा उल्लेख केलेला आहे. तेर मध्ये सापडलेले मद्यकुंभ, जाती,दिवे,नाणी,रेड पोलिश वेअर व अन्य अवशेष वरून तेर व रोम यांचे घनिष्ट संबंध होते असे स्प्ष्ट होते. इ.स.१९५८ च्या उत्खलनात सापडलेल्या नाण्यावर 'सातकणीस' ही ब्राह्मी अक्षरे आढळून येतात. तर इ.स.१९६७-६८ च्या उत्खलनात वशिष्टीपुत्र पुळुमावीचे नाणे सापडलेले आहे. त्याचप्रमाणे १९८६ मध्ये सापडलेल्या ब्राह्मी शिलालेखावर वाशिष्टीपुत्र या सातवाहन राजाचा उल्लेख स्पष्टपणे दिसून येतो.या शिलालेखात वशिष्टीपुत्र पुळुमावी याच्या १० वर्षांच्या कारकिर्दीचा उल्लेख आहे. तेर येथील त्रिविक्रम मंदिरात सापडलेली कार्तिकेची अप्रतिम मूर्ती राष्ट्रकूटकालीन असल्याचे सिद्ध होते.शिलाहार घराण्याच्या तीन प्रमुख शाखांपैकी उत्तर कोकण व कोल्हापूर ही दोन घराणी आपले पूर्वज प्रारंभी तगर नामक सुंदर नगरात राज्य करीत होते असे अभिमानाने दर्शवतात.यादव राजा रामराजाची नाणी देखील तेर मध्ये सापडली आहेत. यादवकाळात होऊन गेलेले संत गोरोबा काका यांचे गाव तेरच..! म्हणूनच आज तेरला गोरा कुंभाराचे तेर म्हणून देखील ओळखले जाते. इ.स १४ व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात अल्लाउद्दीन खिलजीने हा प्रदेश जिंकून घेतला. त्यानंतर तेर वर बहामनी, निजामशाही, आदिलशाही आणि औरंगजेबाने राज्य केले.म्हणजेच प्राचीन काळापासून आजपर्यंत इतिहासाचे कालखंड बदलले मात्र तेर चे महत्व अबाधितच राहिल्याचे दिसून येते.
                        आम्ही तेरणेची परिक्रमा करून तेर गाव पहिले.आजही तेर मध्ये सातवाहनकालीन खापराचे तुकडे सर्रास पाहिला मिळतात.सातवाहनकालीन भाजक्या विटांनी बांधलेला स्तूप आम्ही पाहिला. येथील त्रिविक्रम मंदिर, उत्तरेश्वर मंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. पुरातत्वखात्याने स्तूप व मंदिरांचे केलेले संवर्धन कौतुकास्पद आहे.येथील रामलिंगाप्पा लामतुरे या संग्रहालयाला आम्ही भेट दिली. तेरच्या वैभवशाली इतिहासाचे संवर्धन या संग्रहालयात केले आहे. उत्खलनात सापडलेल्या विविध वस्तूंचे जतन या संग्रहालयात करून ठेवले आहे. या संग्रहालयाच्या मागच्या बाजूलाच बांधकामामध्ये मौर्यकालीन विहिर सापडलेली आहे. एव्हाना आत्ता सूर्य डोक्यावर आला होता.त्याने आम्हाला पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांची जाणीव करून दिली. आत्ता मस्त पैकी गावरान जेवणावर ताव मारायचा असा बेत प्रत्येकजण मनातल्या मनात आखत होत.पण त्यादिवशी महाशिवरात्री असल्याने आम्हाला जेवण कुठे मिळेना. शेवटी एका हॉटेलमध्ये नाष्टा मिळाला आणि पोटातले कावळे शांत झाले. दुपारनंतर आम्ही तेरचा निरोप घेऊन पुन्हा उस्मानाबाद गाठले.उस्मानाबाद ला पोहचे पर्यंत चार वाजले होते.आमचे परतीची ट्रेन साडे अकराची होती.त्यामुळे अजून आमच्या हातात वेळ शिल्लक होता.
                      उस्मानाबाद शहरापासून आठ किमी अंतरावर असलेल्या धाराशिव लेण्यांना भेट देण्याचं आम्ही ठरवलं. या लेण्या निर्मनुष्य असल्यामुळे जायचं कस हा प्रश्न होता.कसाबसा एक रिक्षावाला तयार झाला. त्यालाही रस्ता नेमका माहित नसल्याने आम्हाला चुकीच्या पत्यावर सोडून तो पसार झाला. पण आम्ही हार मानायला तयार नव्हतो. शेवटी मिळेल त्या गाडीला हात करून आम्ही धाराशिव पर्यंत पोहचलोच. साधारण पाचव्या ते सातव्या शतकातील या लेण्या आहेत. या मध्ये एकूण सात लेण्या असून त्या पाहताना आपण हरखून जातो. या लेण्या मूळच्या बुद्धिस्ट असून नंतर त्या जैन धर्मामध्ये रूपांतरित झाल्या असे मानले जाते.या लेण्यांमध्ये महावीर स्वामी व पार्श्वनाथ यांच्या मूर्ती रेखाटलेल्या आहेत. यातील दोन क्रमांकाची लेणी सर्वात मोठी असून ती अजिंठा लेण्याशी मिळतीजुळती आहे असे काही अभ्यासकांचे मत आहे. दिवसभर केलेल्या धावपळीनंतर निरव शांततेचा निशद्बआनंद घेत आम्ही सूर्यास्त पाहिला. आता हळूहळू अंधार गडद होत होता. त्याआधी आम्हाला उस्मानाबादला पोहचायचे होते.आणि त्या माळरानातून पायी जाण्याशिवाय पर्याय नव्हता.आता किर्रर्र अंधार आणि त्या ओसाड माळरानात पायाखाली प्राण्यांचे सांगाडे...! हुश्श.. पोहचलो एकदाच उस्मानाबादला..
                   आम्हाला कडकडून भूक लागली होती.कदाचित रात्री सुद्धा आम्हला नाष्टा करावा लागेल अशी चिन्हे दिसत होती. बहुदा महाशिवरात्रीचा मुहूर्त आम्हाला उपवास घडवणार होता. अथक शोधमोहिमेनंतर कसबस एका हॉटेल मध्ये जेवण मिळालं.आणि तृप्तीचा ढेकर देऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. एक मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होत.या सर्व आठवणींचे गाठोडे मनाशी बांधून आमचा परतीचा प्रवास सुरु झाला....
                                                                                                                                    - मुक्ताफळ
                                                                                                                               (कु.मुक्ता भारत शिंदे.)

जुनं ते सोनं : इतिहासाचा मौल्यवान खजिना

            काल बाथरूममधून पाणी पुढे जात नव्हतं. पाणी कुठे तरी chock up झालं असणार.. ड्रेनेज क्लीनिंग पावडर टाकून वैगेरे हा प्रश्न सुटेल असं...