Monday 3 September 2018

भिडे वाडा व्हेंटिलेटरवर आहे....!

              सन १८४८ भारतात इंग्रज राजवट सुरू होती. समाज अज्ञान, दारिद्य्र, स्त्री-पुरुष भेदभाव, उच्च-निचता या सारख्या अनेक समस्यांनी ग्रासलेला होता. याकाळात मुलींना शिक्षण घेणे तर दूरच पण माणूस म्हणून मुक्तपणे जगण्याचा अधिकार देखील नव्हता.
                 अश्यावेळेस महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले या दांपत्याने समाजातील कर्मठ रुढी परंपरांविरुध्द बंड पुकारले. समाजातील ही विषमता नष्ट करायची असेल तर तळागाळातील लोकांपर्यंत विशेषतः स्त्रीयांपर्यंत शिक्षण पोहचवणे आवश्यक आहे हे त्यांनी जाणले. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यामधील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची देशातील पाहिली शाळा या दांपत्याने सुरू केली. ही शाळा चालवणे सोपे नव्हते. पुण्यातील कर्मठ सनातनी लोकांनी याला विरोध केला. मात्र या विरोधाला न जुमानता सावित्रीबाईंनी आपले स्त्री शिक्षणाचे कार्य चालू ठेवले. भिडे वाड्यात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. हा भिडे वाडा स्त्री शिक्षणाच्या ऐतिहासिक क्रांतीचा साक्षीदार झाला. पण आज......
                   ज्या भिडे वाड्या मध्ये मुलींनी पहिल्यांदा मोकळा श्वास घेतला. तो वाडा आज अखेरची घटका मोजतोय. वाड्याच्या भिंती कोसळण्याच्या मार्गावर आहेत, छत मोडकळीस आलंय, आतमध्ये मातीचे ढिगारे आणि कचऱ्याशिवाय काही नाही. कोणे एकेकाळी येथेच स्त्री शिक्षणाचा इतिहास घडला होता. यावर विश्वास बसत नाही. अश्या या भिडे वाड्याला सरकारकडून देखील दुर्लक्षित करण्यात आलय. वाड्याच्या डागडुजीसाठी निधी मंजूर झाला असला तरी अजून त्या दृष्टीने कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. भिडे वाडा हा विद्यमान पालकमंत्री गिरीष बापट यांच्या मतदारसंघात येतो. मात्र सत्तेचा कार्यकाल संपत आला तरी देखील वाड्याच्या नव उभारणी साठी बापटांकडून केवळ आश्वासनांशिवाय कोणतेही काम झाले नाही.
         ऐतिहासिक भिडे वाड्याच्या समोरच प्रसिध्द दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिर आहे. या मंदिराची स्थापना १८९३ ची. त्यावेळेस छोटेखानी असलेल्या या मंदिराचा आत्ता मोठा विस्तार झालेला आहे. त्याच्या समोरच असलेला भिडे वाडा मात्र स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडतोय. एका बाजूला कथित विद्येची देवता आणि दुसऱ्या बाजूला विद्येचे मूर्तिमंत असलेले स्मारक या दोघांच्या विकासातील विरोधाभास आपण लक्षात घेतला पहिजे.
                   ऐतिहासिक स्थळांच्या बाबतीत आपली असलेली उदासीनता  खेददायक आहे. ऐतिहासिक स्थळांचे,  वास्तूंचे जतन व्हावे व त्यातून सर्वांनीच प्रेरणा घेवून नवनिर्मितीचा ध्यास धरावा. हा दृष्टीकोनच आपण कुठेतरी विसरत चालोय..
               ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार असलेला हा भिडे वाडा आज व्हेंटिलेटरवर आहे. या अवस्थेत तो आपल्या सर्वांच्या मदतीची वाट पाहतोय.....
     
                                                        - मुक्ताफळ
                                                   (कु.मुक्ता भारत शिंदे.)  

जुनं ते सोनं : इतिहासाचा मौल्यवान खजिना

            काल बाथरूममधून पाणी पुढे जात नव्हतं. पाणी कुठे तरी chock up झालं असणार.. ड्रेनेज क्लीनिंग पावडर टाकून वैगेरे हा प्रश्न सुटेल असं...