Wednesday 2 October 2019

.....म्हणूनच ग्रेटा तू खरोखरच ग्रेट आहेस.

                   "आमच्या अंगावर पोकळ शब्द फेकून तुम्ही आमची स्वप्न आमचं बालपण हिरावून घेतलंय. आणि तरी सुद्धा मी भाग्यवंतांपैकी एक आहे. कारण लोक त्रस्त आहेत, जीवनमरणाच्या उंबरठ्यावर आहेत, संपूर्ण भवतालच कोसळत चालय. आम्ही नामशेष होण्याच्या मार्गावर आहोत. आणि तुम्ही कश्याच गुणगान गाताय... आर्थिक उलाढाल आणि पैसा..? या परिकथे मध्ये तुम्ही रमताय...! तुमची हिम्मतच कशी होते....??" एका सोळा वर्षाच्या मुलीने असा प्रश्न केल्यामुळे हवामान परिषदेतील नेते निर्रुतर झालेत. 
                     ग्रेटा थनबर्ग राइट लाइव्हलीहूड या पर्यायी नोबेल पुरस्काराची विजेता... गेल्या वर्षी शाळा बुडून स्वीडनच्या संसदेबाहेर "जर भविष्यच नसेल तर शिकायचं कश्यासाठी?" असा आर्त टाहो तिनी फोडला होता. वाढत्या ऊर्जा वापरामुळे वाढत असलेल्या कार्बन उत्सर्जनामुळे पृथ्वी तापतेय आणि या जागतिक तापमानवाढीचे दुष्परिणाम हवामान बदलाच्या रूपाने दिसू लागलेत. ग्रेटाने हवामान बदलाच्या मुद्द्यावर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. 
                    आज राष्ट्रीय पर्यावरणीय आणीबाणी जाहीर करण्यासारखी परिस्थिती का निर्माण झाली? विकासाच्या नावाखाली विकसित देशांची पर्यावरणाला घातक असलेली आडमुठी धोरणे, विकसनशील देशांची विकासाबाबतची हाव आणि अविकसित देशांची जीवनावश्यक गरज पूर्ण करताना होणारी घुटमळ.. या सर्वांमध्ये विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. हे कुठे तरी थांबायला हवं.. जसा पर्यावरण रक्षणाचा अट्टहास आहे तसा शाश्वत विकास देखील गरजेचा आहे. म्हणजे विकास आणि पर्यावरण निवडताना यापैकी कोणाचा तरी बळी जाणारच... पण हा शाश्वत विकास आपल्याला पर्यावरणाला सोबत घेऊन करता आला तर....! याकरिताच ग्रेटाने " FRIDAY FOR FUTURE " हि मोहीम उघडलीये.तिच्या या मोहिमेला जगभरातून पाठिंबा मिळतोय. ग्रेटाने स्वीडनच्या राजकारण्यांना, “मी माझ्या मनामध्ये जी भीती घेऊन जगतेय ती भीती जेव्हा तुमची झोप उडवेल तेव्हा तुम्ही वातावरणबदलाविरोधात पावले उचलाल. मला तुम्हाला माझ्या मनातील भीतीशी ओळख करून द्यायची आहे.” असं तिने ठणकावून सांगितलं होतं. कोणतीही गोष्ट आधी स्वतः करा मग लोकांना सांगा, या उक्ती प्रमाणे ग्रेटाने याची सुरवात स्वतःच्या घरापासून केलीये. हवामान बदलाच्या परिषदेसाठी पंधरा तासांचा सागरी प्रवास करून ती हजर झाली. दैनंदिन जीवनातील काही सवयी ज्या पर्यावरणाला घातक आहेत त्या कमी करून पर्यावरण वाचवण्यासाठी आपण हातभार लावू शकतो हे तिनी दाखून दिलंय.                            
                   महात्मा गांधीनी सांगितलेली ग्रामविकासावर आधारित जीवनशैली यासाठीचा आदर्श आहे. पर्यावरणाच्या सानिध्यातील जीवनशैली आत्मसात करणे ही आजच्या काळाची गरज आहे. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जिथे लोकांना आपल्या दोन वेळेच्या जेवणाची चिंता आहे. तिथे पर्यावरणला दुय्यम स्थान मिळाले तर नवल वाटण्याचे कारण नाही. पण उद्याच्या शाश्वत भविष्यासाठी पर्यावरणाला सोबत घेऊन त्याच्या साखळीतला एक दुवा म्हणून जगायचय आपल्याला... यासाठी ग्रेटाने उघडलेली ही मोहीम कौतुकास्पदच आहे. एका सोळा वर्षाच्या मुलीने मोठ्यांनी देखील लहानांकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत हे दाखून दिलंय....म्हणूनच ग्रेटा तू खरोखरच ग्रेट आहेस. 

                                                          -  मुक्ताफळ 
                                                     (कु.मुक्ता भारत शिंदे.)
 

Saturday 20 April 2019

अजून खूप प्रवास बाकी आहे.....

      तीन वर्षांपूर्वी पुण्यात प्रवेश करताना मी जेवढी अस्वस्थ होते तेवढीच अस्वस्थ आज आहे. तीन वर्षांपूर्वीचा तो दिवस आजही मला लख्ख आठवतो. एस.पी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, अँडमिशन झाल. तोपर्यंत सगळ ठीक होत. पण जेव्हा प्रत्यक्षात पुण्यात रहायची वेळ आली तेव्हा हा साताऱ्याचा पक्षी गांगारुन गेला. घरच्यांनपासून, मैत्रिणींनपासून दूर जायच आणि मुख्य म्हणजे सातारा सोडायचा या विचारांनी भीतीने पोटात खड्डा पडला. चार दिवस अन्न-पाणी जाईना. खूप विचार करून एस.पी मधल अँडमिशन कँन्सल कराव आणि परत सातारा गाठावा असा आततायीपणाचा निर्णय मी घेतला. सगळ्यांनी समजवून पाहिल. पण मी माझा हेका सोडायला तयार नव्हते.
                   शेवटच्या क्षणी आत्मपरीक्षण करताना मला जाणवल. जर मी आज माघार घेतली तर पुन्हा कधीच माझ्या कंफर्ट झोन मधून बाहेर पडू शकणार नाही. आत्मविश्वास गमावून बसेन. बस्स झाल... आत्ता फार विचार न करता पाण्यात उडी मारलीच आहे तर पळपुटेपणा न करता ताठ मानेन किनारा गाठावा अस मी ठरवल. पहिले कित्येक दिवस पुण्यातला प्रत्येक चौक, प्रत्येक रस्ता मला सातारचा भास घडवून आणत होता. पहिले काही दिवस मी मनानी कधी पुण्यात पोहचलेच नव्हते. मी स्वतःच्याच मनाची समजूत घालायचे 'धीर धर असेच निघून जातील हे तीन वर्ष...'
                    पण हळूहळू या पुण्यातील एस.पी च्या दुनियादारीत हा सातारचा पक्षी रूळू लागला. खरोखरच हे तीन वर्ष कसे गेले कळलच नाही. एस.पी नी मला काय दिल या प्रश्नच उत्तर शब्दात मांडण कठीण आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास, विचारांमधील सकारात्मकता, आशावाद, सतत नाविन्याची भूक आणि अश्या कितीतरी गोष्टींचे कित्ते एस.पी च्या तालमीत आम्ही गिरवले. अहिरे सर आणि शेंडे सरांनसारख्या शिक्षकांनी अनुभवांच्या आणि ज्ञानाच्या नगरीतून आम्हाला सफर घडवून आणली. इतिहास अभ्यास मंडळातला प्रवास अविस्मरणीय होता. गेल्या तीन वर्षात इतिहास विभागामध्ये केलेले कार्यक्रम म्हणजे अनुभवांची शिदोरीच म्हणावी लागेल. आणि मुख्य म्हणजे आयुष्यभर सोबत राहणारेत असे असे मैत्रीचे "उनाड" बंध या कॉलेजमध्येच जोडले गेले. कळत-नकळत अनेक गोष्टी कॉलेजने तसेच पुण्याने देखील शिकवल्या. आज निरोप घेताना आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्यावर या आठवणींच्या वलयातील अनुभव उपयोगी पडतीलच.
                        अगदी काल परवा सुरू झालेला हा प्रवास आज अचानक थांबतोय... एका नव्या प्रवासासाठी... तेव्हा मला रॉबर्ट फ्रास्ट या अमेरिकन कवीची सुप्रसिद्ध कविता खूप प्रकर्षाने आठवते..

                    हे समोरच दृश्य खूप मोहक आहे.
                          इथंच रेंगाळावस वाटत.
                   पण मी नियतीला वचन दिल आहे.
                      अजून खूप प्रवास बाकी आहे...
                           खूप प्रवास बाकी आहे.....

                                                          - मुक्ताफळ
                                                    (कु.मुक्ता भारत शिंदे.)

Friday 19 April 2019

जिज्ञासा

                     हा रविवार जरा वेगळा होता. पण म्हणा सुट्टीत प्रत्येक दिवस हा रविवारच वाटतो. आदल्या दिवशीच कांबिरे मामांनी मला What's up वरून एका इतिहास सहली विषयी कळवल होत. श्री.चंद्रकांत कांबिरे हे नेहमीच आम्हाला वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल, चांगल्या चांगल्या नाटकांबद्दल माहिती देत असतात. या इतिहास सहलीविषयी त्यांनी आवर्जून सांगितल होत त्यामुळे मी ही या सहलीला जाण्यास उत्सुक होते. 'जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था'  यांच्या मार्फत या अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास सहलीचे ठिकाण होते माहुली! आत्ता माहुली म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर येते ती स्मशानभूमी...! आत्ता अश्या ठिकाणी कोणता बरं इतिहास असेल याची उत्सुकता होती.
                    साडेतीन वाजता आम्ही माहुली येथील लक्ष्मी मंदिराजवळ जमलो. तिथे श्री.विक्रांत मंडपेसरांनी सर्वांच स्वागत केल. त्यांनी जिज्ञासाच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. गेले २२ वर्ष मंडपेसर व त्यांचे सहकारी जिज्ञासा मार्फत ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम करत आहेत. सर्वप्रथम त्यांनी आम्हाला समाधी म्हणजे काय? तसेच मराठाशाहीत समाधी बांधण्याचा उद्देश काय होता हे सांगितल. समाधी बांधण्याचा उद्देश हा इतर लोकांना त्यातून प्रेरणा मिळावी हा होता. तेथे आम्ही २-३ समाध्या बघितल्या पण त्यांची नावे आज कुणालाच सांगता येत नाहीत. कारण या समाध्यांची कोठेही नोंद नाही. हा आपल्या इतिहासातील दुर्लक्षित भागच म्हणावा लागेल.
                     पुढे साताऱ्यातील आघाडीचे कलाकार श्री.सागर गायकवाड यांनी डॉक्युमेंटेशनचा लाईव्ह वॉटर कलरिंग हा प्रकार दाखवला.त्यांनी इतिहास व चित्रकला यांची सुरेख सांगड घालत त्यांनी इतिहासातील चित्रकलेचे महत्व पटवून दिले. नंतर आम्ही संभाजीपुत्र शाहूंच्या लाडक्या कुत्र्याची समाधी बघितली असे म्हणतात, या कुत्र्याने शाहूंना वाघच्या हल्ल्यातून वाचवले होते. त्यामुळे हा अत्यंत नावाजलेला कुत्रा होता. काही ठिकाणी तर हा कुत्रा नवसाला पावण्याचे ही उल्लेख आहेत. नंतर आम्ही ३०० वर्ष जुना असलेला व अजूनही वापरत असलेला रथ पाहिला. मराठाशैलीतील हा रथ अत्यंत अप्रतिम असा आहे. पुढे आम्ही वटवाघळांच झाड पाहिल.मंडपेसरांनी आपल्या ओघवत्या शैलीत या वटवाघळांचा प्रवास सांगितला. रत्नागिरी, दाभोळ, गुहाघर इथल्या फळभागातील फळ खावून ती परत येथेच येतात. मात्र दुर्दैवाने हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
                     नंतर आम्ही सुप्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेल काशी विश्वेश्वराच मंदिर पाहिल. काशी विश्वेश्वर मंदिरातील नक्षीकाम खरोखरच अप्रतिम आहे. साधरण १७३५
च्या सुमारास या मंदिराच बांधकाम झालय. या मंदिराची शैली ही यादवशैली असून येथील दीपमाळ खरोखरच देखणी अशी आहे. काशी विश्वेश्वर मंदिरातील बारकावे पाहताना यादवकालीन शैलीची महानता लक्षात येते. पुढे आम्ही महाराणी ताराबाई व थोरल्या शाहूंची समाधी देखील बघितली. या समाध्या १० वर्षापूर्वी नदीखाली गाडल्या गेल्या होत्या. मात्र जिज्ञासा मंचच्या हालचालींमुळे या समाध्या शोधण्यात यश आले.
                   नंतर कृष्णा- वेण्णाच्या संगमावरून हातात हात घालून आम्ही नदी पार केली. या ठिकाणी दबंग बरोबरच अनेक सिनेमांच शूटिंग झालेल आहे. रामेश्वर मंदिरात क्षेत्र माहुलीच्या सरपंचानी सर्वांचे स्वागत केले. सीता, राम, लक्ष्मण आणि हनुमान यांच हे मंदिर आहे. या मंदिरातील राम व लक्ष्मण यांना मिशा आहेत. व रामाच्या हातात धनुष्यबाण नाही तसेच सीता ही रामाच्या मांडीवर बसलेली आहे. या मूर्तींवरून अस लक्षात येते की, त्या काळातील लोकांची देव हा  आपल्यातीलच एक आहे अशी भावना होती. क्षेत्र माहुलीतील स्थानिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी क्षेत्र माहुलीच्या ऐतिहासिक वारश्याचे सुंदर शब्दात वर्णन केले.
                      त्यानंतर आम्ही राधा- शंकर मंदिराकडे जाण्यास निघालो. वाट खडतर असल्यामुळे आम्ही ऐतिहासिक सहली बरोबरच ट्रेकिंगचीही मज्जा लुटत होतो. पण इथे मला माझा अतीउत्साह नडला आणि लॉंग जंप मारायच्या नादात मी बाभळीच्या काट्यात जाऊन पडले. हातापायात चांगलेच काटे घुसले, जबर मुक्का मार लागल्याने पायही दोन दिवस चांगलच सुजला होता.
                      पुढे मंडपेसरांनी नदी व घाट यांची परंपरा उलघडून सांगितली. खर तर मंडपेसरांच्या आवाजाची ओळख संपूर्ण साताऱ्याला आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांना ऐकण्याचा अनुभव खूप मस्त होता. त्यांच्या बोलण्याच्या विशिष्ठ शैलीमुळे त्यांचे बोलणे ऐकतच रहावेसे वाटते. प्रत्यक्ष माहुलीला भेट दिल्यानंतर त्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात आले. आज आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात इतके व्यस्त झालो आहोत की, आपल्या पूर्वजांच्या ऐतिहासिक वारश्याकडे आपले दुर्लक्ष होत आहे.
                       अश्या या इतिहास सहलीचा गोड शेवट बिलेश्वर मंदिरात झाला. नदी ओलांडून परत संगम माहुलीला पोहचेपर्यंत आठ वाजून गेले होते. मात्र त्या काळोखातही 'जिज्ञासा' ने आमच्या सर्वांच्या मनात इतिहासाविषयी पेटवलेला दिवा अजूनच प्रखर होत होता.

(टीप- सदर लेख चार वर्षांपूर्वी लिहलेला आहे. जागतिक वारसा दिनाच्या १८एप्रिल*  निमित्ताने तो ब्लॉगच्या माध्यमातून प्रकाशित करत आहे.)

                                                          - मुक्ताफळ
                                                     (कु.मुक्ता भारत शिंदे.)

जुनं ते सोनं : इतिहासाचा मौल्यवान खजिना

            काल बाथरूममधून पाणी पुढे जात नव्हतं. पाणी कुठे तरी chock up झालं असणार.. ड्रेनेज क्लीनिंग पावडर टाकून वैगेरे हा प्रश्न सुटेल असं...