Wednesday, 2 October 2019
.....म्हणूनच ग्रेटा तू खरोखरच ग्रेट आहेस.
Saturday, 20 April 2019
अजून खूप प्रवास बाकी आहे.....
तीन वर्षांपूर्वी पुण्यात प्रवेश करताना मी जेवढी अस्वस्थ होते तेवढीच अस्वस्थ आज आहे. तीन वर्षांपूर्वीचा तो दिवस आजही मला लख्ख आठवतो. एस.पी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, अँडमिशन झाल. तोपर्यंत सगळ ठीक होत. पण जेव्हा प्रत्यक्षात पुण्यात रहायची वेळ आली तेव्हा हा साताऱ्याचा पक्षी गांगारुन गेला. घरच्यांनपासून, मैत्रिणींनपासून दूर जायच आणि मुख्य म्हणजे सातारा सोडायचा या विचारांनी भीतीने पोटात खड्डा पडला. चार दिवस अन्न-पाणी जाईना. खूप विचार करून एस.पी मधल अँडमिशन कँन्सल कराव आणि परत सातारा गाठावा असा आततायीपणाचा निर्णय मी घेतला. सगळ्यांनी समजवून पाहिल. पण मी माझा हेका सोडायला तयार नव्हते.
शेवटच्या क्षणी आत्मपरीक्षण करताना मला जाणवल. जर मी आज माघार घेतली तर पुन्हा कधीच माझ्या कंफर्ट झोन मधून बाहेर पडू शकणार नाही. आत्मविश्वास गमावून बसेन. बस्स झाल... आत्ता फार विचार न करता पाण्यात उडी मारलीच आहे तर पळपुटेपणा न करता ताठ मानेन किनारा गाठावा अस मी ठरवल. पहिले कित्येक दिवस पुण्यातला प्रत्येक चौक, प्रत्येक रस्ता मला सातारचा भास घडवून आणत होता. पहिले काही दिवस मी मनानी कधी पुण्यात पोहचलेच नव्हते. मी स्वतःच्याच मनाची समजूत घालायचे 'धीर धर असेच निघून जातील हे तीन वर्ष...'
पण हळूहळू या पुण्यातील एस.पी च्या दुनियादारीत हा सातारचा पक्षी रूळू लागला. खरोखरच हे तीन वर्ष कसे गेले कळलच नाही. एस.पी नी मला काय दिल या प्रश्नच उत्तर शब्दात मांडण कठीण आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास, विचारांमधील सकारात्मकता, आशावाद, सतत नाविन्याची भूक आणि अश्या कितीतरी गोष्टींचे कित्ते एस.पी च्या तालमीत आम्ही गिरवले. अहिरे सर आणि शेंडे सरांनसारख्या शिक्षकांनी अनुभवांच्या आणि ज्ञानाच्या नगरीतून आम्हाला सफर घडवून आणली. इतिहास अभ्यास मंडळातला प्रवास अविस्मरणीय होता. गेल्या तीन वर्षात इतिहास विभागामध्ये केलेले कार्यक्रम म्हणजे अनुभवांची शिदोरीच म्हणावी लागेल. आणि मुख्य म्हणजे आयुष्यभर सोबत राहणारेत असे असे मैत्रीचे "उनाड" बंध या कॉलेजमध्येच जोडले गेले. कळत-नकळत अनेक गोष्टी कॉलेजने तसेच पुण्याने देखील शिकवल्या. आज निरोप घेताना आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्यावर या आठवणींच्या वलयातील अनुभव उपयोगी पडतीलच.
अगदी काल परवा सुरू झालेला हा प्रवास आज अचानक थांबतोय... एका नव्या प्रवासासाठी... तेव्हा मला रॉबर्ट फ्रास्ट या अमेरिकन कवीची सुप्रसिद्ध कविता खूप प्रकर्षाने आठवते..
हे समोरच दृश्य खूप मोहक आहे.
इथंच रेंगाळावस वाटत.
पण मी नियतीला वचन दिल आहे.
अजून खूप प्रवास बाकी आहे...
खूप प्रवास बाकी आहे.....
- मुक्ताफळ
(कु.मुक्ता भारत शिंदे.)
Friday, 19 April 2019
जिज्ञासा
हा रविवार जरा वेगळा होता. पण म्हणा सुट्टीत प्रत्येक दिवस हा रविवारच वाटतो. आदल्या दिवशीच कांबिरे मामांनी मला What's up वरून एका इतिहास सहली विषयी कळवल होत. श्री.चंद्रकांत कांबिरे हे नेहमीच आम्हाला वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल, चांगल्या चांगल्या नाटकांबद्दल माहिती देत असतात. या इतिहास सहलीविषयी त्यांनी आवर्जून सांगितल होत त्यामुळे मी ही या सहलीला जाण्यास उत्सुक होते. 'जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था' यांच्या मार्फत या अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास सहलीचे ठिकाण होते माहुली! आत्ता माहुली म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर येते ती स्मशानभूमी...! आत्ता अश्या ठिकाणी कोणता बरं इतिहास असेल याची उत्सुकता होती.
साडेतीन वाजता आम्ही माहुली येथील लक्ष्मी मंदिराजवळ जमलो. तिथे श्री.विक्रांत मंडपेसरांनी सर्वांच स्वागत केल. त्यांनी जिज्ञासाच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. गेले २२ वर्ष मंडपेसर व त्यांचे सहकारी जिज्ञासा मार्फत ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम करत आहेत. सर्वप्रथम त्यांनी आम्हाला समाधी म्हणजे काय? तसेच मराठाशाहीत समाधी बांधण्याचा उद्देश काय होता हे सांगितल. समाधी बांधण्याचा उद्देश हा इतर लोकांना त्यातून प्रेरणा मिळावी हा होता. तेथे आम्ही २-३ समाध्या बघितल्या पण त्यांची नावे आज कुणालाच सांगता येत नाहीत. कारण या समाध्यांची कोठेही नोंद नाही. हा आपल्या इतिहासातील दुर्लक्षित भागच म्हणावा लागेल.
पुढे साताऱ्यातील आघाडीचे कलाकार श्री.सागर गायकवाड यांनी डॉक्युमेंटेशनचा लाईव्ह वॉटर कलरिंग हा प्रकार दाखवला.त्यांनी इतिहास व चित्रकला यांची सुरेख सांगड घालत त्यांनी इतिहासातील चित्रकलेचे महत्व पटवून दिले. नंतर आम्ही संभाजीपुत्र शाहूंच्या लाडक्या कुत्र्याची समाधी बघितली असे म्हणतात, या कुत्र्याने शाहूंना वाघच्या हल्ल्यातून वाचवले होते. त्यामुळे हा अत्यंत नावाजलेला कुत्रा होता. काही ठिकाणी तर हा कुत्रा नवसाला पावण्याचे ही उल्लेख आहेत. नंतर आम्ही ३०० वर्ष जुना असलेला व अजूनही वापरत असलेला रथ पाहिला. मराठाशैलीतील हा रथ अत्यंत अप्रतिम असा आहे. पुढे आम्ही वटवाघळांच झाड पाहिल.मंडपेसरांनी आपल्या ओघवत्या शैलीत या वटवाघळांचा प्रवास सांगितला. रत्नागिरी, दाभोळ, गुहाघर इथल्या फळभागातील फळ खावून ती परत येथेच येतात. मात्र दुर्दैवाने हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
नंतर आम्ही सुप्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेल काशी विश्वेश्वराच मंदिर पाहिल. काशी विश्वेश्वर मंदिरातील नक्षीकाम खरोखरच अप्रतिम आहे. साधरण १७३५
च्या सुमारास या मंदिराच बांधकाम झालय. या मंदिराची शैली ही यादवशैली असून येथील दीपमाळ खरोखरच देखणी अशी आहे. काशी विश्वेश्वर मंदिरातील बारकावे पाहताना यादवकालीन शैलीची महानता लक्षात येते. पुढे आम्ही महाराणी ताराबाई व थोरल्या शाहूंची समाधी देखील बघितली. या समाध्या १० वर्षापूर्वी नदीखाली गाडल्या गेल्या होत्या. मात्र जिज्ञासा मंचच्या हालचालींमुळे या समाध्या शोधण्यात यश आले.
नंतर कृष्णा- वेण्णाच्या संगमावरून हातात हात घालून आम्ही नदी पार केली. या ठिकाणी दबंग बरोबरच अनेक सिनेमांच शूटिंग झालेल आहे. रामेश्वर मंदिरात क्षेत्र माहुलीच्या सरपंचानी सर्वांचे स्वागत केले. सीता, राम, लक्ष्मण आणि हनुमान यांच हे मंदिर आहे. या मंदिरातील राम व लक्ष्मण यांना मिशा आहेत. व रामाच्या हातात धनुष्यबाण नाही तसेच सीता ही रामाच्या मांडीवर बसलेली आहे. या मूर्तींवरून अस लक्षात येते की, त्या काळातील लोकांची देव हा आपल्यातीलच एक आहे अशी भावना होती. क्षेत्र माहुलीतील स्थानिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी क्षेत्र माहुलीच्या ऐतिहासिक वारश्याचे सुंदर शब्दात वर्णन केले.
त्यानंतर आम्ही राधा- शंकर मंदिराकडे जाण्यास निघालो. वाट खडतर असल्यामुळे आम्ही ऐतिहासिक सहली बरोबरच ट्रेकिंगचीही मज्जा लुटत होतो. पण इथे मला माझा अतीउत्साह नडला आणि लॉंग जंप मारायच्या नादात मी बाभळीच्या काट्यात जाऊन पडले. हातापायात चांगलेच काटे घुसले, जबर मुक्का मार लागल्याने पायही दोन दिवस चांगलच सुजला होता.
पुढे मंडपेसरांनी नदी व घाट यांची परंपरा उलघडून सांगितली. खर तर मंडपेसरांच्या आवाजाची ओळख संपूर्ण साताऱ्याला आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांना ऐकण्याचा अनुभव खूप मस्त होता. त्यांच्या बोलण्याच्या विशिष्ठ शैलीमुळे त्यांचे बोलणे ऐकतच रहावेसे वाटते. प्रत्यक्ष माहुलीला भेट दिल्यानंतर त्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात आले. आज आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात इतके व्यस्त झालो आहोत की, आपल्या पूर्वजांच्या ऐतिहासिक वारश्याकडे आपले दुर्लक्ष होत आहे.
अश्या या इतिहास सहलीचा गोड शेवट बिलेश्वर मंदिरात झाला. नदी ओलांडून परत संगम माहुलीला पोहचेपर्यंत आठ वाजून गेले होते. मात्र त्या काळोखातही 'जिज्ञासा' ने आमच्या सर्वांच्या मनात इतिहासाविषयी पेटवलेला दिवा अजूनच प्रखर होत होता.
(टीप- सदर लेख चार वर्षांपूर्वी लिहलेला आहे. जागतिक वारसा दिनाच्या १८एप्रिल* निमित्ताने तो ब्लॉगच्या माध्यमातून प्रकाशित करत आहे.)
- मुक्ताफळ
(कु.मुक्ता भारत शिंदे.)
Monday, 3 September 2018
भिडे वाडा व्हेंटिलेटरवर आहे....!
सन १८४८ भारतात इंग्रज राजवट सुरू होती. समाज अज्ञान, दारिद्य्र, स्त्री-पुरुष भेदभाव, उच्च-निचता या सारख्या अनेक समस्यांनी ग्रासलेला होता. याकाळात मुलींना शिक्षण घेणे तर दूरच पण माणूस म्हणून मुक्तपणे जगण्याचा अधिकार देखील नव्हता.
अश्यावेळेस महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले या दांपत्याने समाजातील कर्मठ रुढी परंपरांविरुध्द बंड पुकारले. समाजातील ही विषमता नष्ट करायची असेल तर तळागाळातील लोकांपर्यंत विशेषतः स्त्रीयांपर्यंत शिक्षण पोहचवणे आवश्यक आहे हे त्यांनी जाणले. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यामधील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची देशातील पाहिली शाळा या दांपत्याने सुरू केली. ही शाळा चालवणे सोपे नव्हते. पुण्यातील कर्मठ सनातनी लोकांनी याला विरोध केला. मात्र या विरोधाला न जुमानता सावित्रीबाईंनी आपले स्त्री शिक्षणाचे कार्य चालू ठेवले. भिडे वाड्यात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. हा भिडे वाडा स्त्री शिक्षणाच्या ऐतिहासिक क्रांतीचा साक्षीदार झाला. पण आज......
ज्या भिडे वाड्या मध्ये मुलींनी पहिल्यांदा मोकळा श्वास घेतला. तो वाडा आज अखेरची घटका मोजतोय. वाड्याच्या भिंती कोसळण्याच्या मार्गावर आहेत, छत मोडकळीस आलंय, आतमध्ये मातीचे ढिगारे आणि कचऱ्याशिवाय काही नाही. कोणे एकेकाळी येथेच स्त्री शिक्षणाचा इतिहास घडला होता. यावर विश्वास बसत नाही. अश्या या भिडे वाड्याला सरकारकडून देखील दुर्लक्षित करण्यात आलय. वाड्याच्या डागडुजीसाठी निधी मंजूर झाला असला तरी अजून त्या दृष्टीने कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. भिडे वाडा हा विद्यमान पालकमंत्री गिरीष बापट यांच्या मतदारसंघात येतो. मात्र सत्तेचा कार्यकाल संपत आला तरी देखील वाड्याच्या नव उभारणी साठी बापटांकडून केवळ आश्वासनांशिवाय कोणतेही काम झाले नाही.
ऐतिहासिक भिडे वाड्याच्या समोरच प्रसिध्द दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिर आहे. या मंदिराची स्थापना १८९३ ची. त्यावेळेस छोटेखानी असलेल्या या मंदिराचा आत्ता मोठा विस्तार झालेला आहे. त्याच्या समोरच असलेला भिडे वाडा मात्र स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडतोय. एका बाजूला कथित विद्येची देवता आणि दुसऱ्या बाजूला विद्येचे मूर्तिमंत असलेले स्मारक या दोघांच्या विकासातील विरोधाभास आपण लक्षात घेतला पहिजे.
ऐतिहासिक स्थळांच्या बाबतीत आपली असलेली उदासीनता खेददायक आहे. ऐतिहासिक स्थळांचे, वास्तूंचे जतन व्हावे व त्यातून सर्वांनीच प्रेरणा घेवून नवनिर्मितीचा ध्यास धरावा. हा दृष्टीकोनच आपण कुठेतरी विसरत चालोय..
ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार असलेला हा भिडे वाडा आज व्हेंटिलेटरवर आहे. या अवस्थेत तो आपल्या सर्वांच्या मदतीची वाट पाहतोय.....
- मुक्ताफळ
(कु.मुक्ता भारत शिंदे.)
Thursday, 9 August 2018
मन धागा धागा जोडते नवा नवा...
त्याच आणि माझ सोयरीक कधी जुळलच नव्हतं. त्याची अवेळी येण्याची सवय, वाट पाहिला लावणं आणि मनमानी कारभार यामुळे मी काहीशी खट्टूच होते त्याच्याशी. त्या दिवशी सुद्धा तो नेहमी सारखाच अचानक आला. ( एव्हाना मला आत्ता त्याच्या अवेळी येण्याची सवय झालीये.) त्यादिवशी मात्र मी वैतागलेच जरा. त्याच्या या मस्तीखोरपणामुळे माझ्या पुढच्या प्लानची वाट लागणार होती.
त्याच्या अश्या अवेळी येण्यानी सगळ्यांचीच धावपळ उडाली होती. तो काही एकटा आला नव्हता नेहमी स्वतःच्या धुंदीत राहणाऱ्या, डोळ्याला न दिसणाऱ्या पण स्पर्शाने स्वतः च अस्तित्व दाखवणाऱ्या त्याच्या दोस्ताला घेऊन तो हजर झाला. तो भेटतो असा की काही वेळ जीव गुदमरून जावा आणि नाही भेटत तेव्हा असा की त्याच्या भेटी अभावी जीव कासावीस व्हावा. त्या दिवशी मात्र मी ठरवलं आपणच थोडं समजूतदारपणाने घेऊया. दोन क्षण त्याच्या सोबतीने घालवूया.. त्याच्या सोबत राजारामपुरी मध्ये भटकायचं या कल्पनेने मी रोमांचित झाले. कित्येक वर्षांनंतर त्याच्या सरींना मी मनमोकळेपणाने झेललं होत. त्याच्या बद्दलचा सगळा रुसवा आत्ता विरून गेला होता. चंचल धावणाऱ्या मनाला आणि विचारांना आत्ता विसाव्याची गरज होती. आपोआप पाऊलं हिंदुस्थान बेकारीकडे वळली. वाफळलेल्या कॉफीचे घोट घेताना किती तरी दिवसात जिची भेटच पडत नव्हती ती "शांती" भेटली.
या अश्या वातावरणात रंकाळा गाठायचा विचार मनात चमकला. मग काय या सुंदर वातावरणातील रंकाळ्याचा नजराणा पाहण्यासाठी स्वारी व्याकुळ झाली. धावतच एका रिक्षावाल्याला गाठलं. वरून "वरूणराजा" बरसतोय, रस्त्यावर लाईट नाही अश्या वेळेस रंकाळ्यावर काय काम असे हावभाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. थोडीफार घासाघाशी करून मी त्याला येण्यासाठी तयार केलं. रंकाळा माझ्या आवडीच ठिकाण.. इथं आल्यावर खूप शांत वाटत. मनातल्या विचारांच्या थैमानाला आवर घालून आपल्या सौंदर्याच्या प्रेमात पाडण्याची कला रंकाळ्यात आहे.
आजूबाजूच्या लोकांच भान आत्ता मला नव्हतं. रंकाळ्यानी मला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेतल होत आणि मी ही वाहवत गेले...
मुक्ताफळ
(कु.मुक्ता भारत शिंदे.)
Thursday, 28 June 2018
वऱ्हाडींना भेट सैंद्रिय बियाण्याची !
आज मानव निसर्गावर विजय मिळवण्याच्या प्रयत्नात स्वतःची आणि निसर्गाची देखील मोठ्या प्रमाणवर हानी करत आहे. विविध पर्यावरणीय समस्या निर्माण होण्यासाठी आपण बऱ्याच वेळेला निसर्गाला दोषी ठरवतो. मात्र या पर्यावरणीय समस्यांना मानवी भोगवादी वृत्ती, हाव आणि आक्रमकता कारणीभूत आहे. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून मानवाने आपला विकास घडवून आणला खरा मात्र त्याची परतफेड करायला तो विसरला.
पण आपल्या सभोवताली काही अशीही माणसे असतात जी निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी क्रियाशील असतात. त्यातीलच एक असलेले स्वामी दांपत्य. श्री.नागेश स्वामी व त्यांच्या पत्नी सौ.भारती स्वामी यांनी उंब्रज जवळील शिवडे या गावी सैंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी रित्या उभारला आहे. मला काही वर्षांपूर्वी शिवडे गावाला भेट देण्याची संधी मिळाली. ( तेथील अनुभवावर मी स्वतंत्र लेख लिहलेला आहे. लवकरच तो क्रमशः प्रकशित करेन.) मानव व निसर्ग एकमेकांशी जोडले जावेत असे या सैंद्रिय शेतीचे प्रयोजन केलेले आहे. ते पाहून निसर्गाचे ऋण फेडायला आपला सुद्धा हातभार लागावा असे वाटत होते. एक वर्षापूर्वी माझ्या आत्तेबहिणीच्या लग्नात येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना आपण विविध सैंद्रिय भाज्यांचे बियाणे द्यावे अशी कल्पना माझ्या डोक्यात आली.
भारती काकूंची स्वतःची बीज बँक आहे. बीज बँक म्हणजे विविध बियांचा संग्रह. त्यांच्याकडे विविध देशी-गावरान बियांचा संग्रह आहे. त्यांसाठी त्या भारत-पाक सीमा ते खाली दक्षिणेपर्यंत जाऊन आल्यात. देशी बियांचे संवर्धन व जतन व्हावे ही त्यांच्या बीज बँकेची उद्दिष्टे. या बीज बँकेत भेंडीचे दोन- तीन प्रकार, घेवड्याचे विविध प्रकार, करटूले, हळद, आंबट-सुका, हदगा, दुधी भोपळा, शेवगा, घोसावळे, हिरडा बेहरडा या औषधी वनस्पती तसेच अनेक दुर्मिळ बियांचा संग्रह आहे. यातील काही निवडक बियाणे लग्नाला येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना देऊन बीज संवर्धनासाठी हातभार लावण्याची कल्पना मी काकूंना बोलून दाखवली त्यांनी सुद्धा तत्काळ होकार देवून माफक दरामध्ये मला हादगा, आंबट-सुका, घोसावळी, दुधी भोपळा, शेवग्याचे बियाणे उपलब्ध करून दिले. विवाह समारंभाला आलेल्या ४०० वऱ्हाडींना आम्ही हे बियाणे भेट दिले. आणि काही दिवसातच त्याचा सकारात्मक प्रतिसाद देखील मिळला. "अगं तू दिलेल्या आंबट-सुक्याची आम्ही चार वेळा भाजी करून खाल्ली, हादग्याला फुलं येयला सुरवात झालीये, घोसावळ्याचा वेल बराच फुलाय आत्ता....) असं अनेक नातेवाईक भेटल्यावर सांगतात. बऱ्याच जणांना घरातील ओला कचरा या भाज्यांच्या रोपांना वापरल्यामुळे ओल्या कचऱ्याचे निर्मूलन होयला देखील मदत झाली.
आरोग्याच्या द्रुष्टीने आपल्या भोजनात सैंद्रिय भाज्यांचा समावेश असणे गरजेचे आहे. माझ्या छोट्याश्या प्रयत्नाला काही प्रमाणात यश मिळालय. असे काही हितकारक ट्रेंड झाल्यास मानव व निसर्ग यांचे नाते घट्ट होयला वेळ लागणार नाही. कारण आपल्याला निसर्गावर विजय मिळवायचा नसून त्याच्या साथीत, त्याच्या साखळीतला एक दुवा म्हणून जगायचं....
मुक्ताफळ
( कु. मुक्ता भारत शिंदे.)
Wednesday, 23 May 2018
सुपरमँन विश्रांतीवर जातोय....
अगदी काल परवाची गोष्ट आहे. IPl च्या स्पर्धेतला रॉयल चेलेंजस् बंगळुरू VS हैदराबाद सामना. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हैदराबादचा अलेक्स हेल्स चौकार, षटकारांची अताषबाजी करत होता. मोईन अलीच्या चेंडूवर त्याने उंच फटका मारला बॉल बाऊंड्री पार करून प्रेक्षकात जाणार तोपर्यंत बाऊंड्रीवर असणारा एबी डी'व्हिलियस् हवेत उंच उडी मारतो आणि सिक्स जाणाऱ्या बॉलचा झेल बनवतो. क्षणभरासाठी प्रेक्षक आवक् होतात आणि पुढच्या क्षणी एबी च्या नावाचा जयघोष होतो.
मूळच्या दक्षिण अफ्रिकेच्या असलेल्या एबी चे चाहते जगभरात आहेत. खेळाडू पेक्षा माणूस म्हणून त्याच्यावर फिदा असलेले असंख्य चाहते आहेत. प्रत्यक्षात दिसायला हा सर्वसामान्य माणूस असला तरी त्याच्या अंगी असलेल्या विविध गुणांमुळे तो इतरांपेक्षा उठून दिसतो. त्याची ३६० डिग्री मध्ये चाललेली फटकेबाजी पाहून चाहते तृप्त होतात. एबी ने आत्तापर्यंत ११४ कसोटी सामन्यातून ८७६५ धावा तर २२८ एकदिवसीय सामन्यातून ९५७७ आणि ७८ टि- ट्वेंटी सामने खेळताना १६७२ धावा काढल्या आहेत. याशिवाय अनेक रेकॉर्ड्स त्याच्या नावावर आहेत.
आता तुम्ही म्हणाल हा क्रिकेट मधला बाप माणूस दिसतोय. पण फक्त क्रिकेटच नाही तर अनेक क्रीडाप्रकारांमध्ये एबी पारंगत आहे. क्रिकेट सोबतच त्याचा हॉकी, फुटबॉल, टेनिस, बँडमिंटन, रग्बी मध्ये देखील त्याचा नावलौकिक आहे. दक्षिण अफ्रीकेसाठी डेव्हीस कप जिंकणाऱ्या ज्युनियर टीमचा तो सदस्य होता. बँडमिंटन अंडर १९ गटात विजेता, ज्युनियर अँथलेटिक्समध्ये फास्टेस्ट १०० मीटरचा विक्रम तर शालेय जलतरण स्पर्धेत ६ विक्रम त्याच्या नावावर आहेत. हा पट्टया फक्त खेळातच हुशार नाही तर एका विज्ञान प्रयोगासाठी मंडेलांच्या हस्ते त्याला राष्ट्रीय स्तरावर मेडल मिळाल आहे. या सर्वात अजून भर म्हणजे तो संगीतकार आहे. उत्तम गातो, गिटार देखील वाजवतो. २०१० मध्ये त्याचा एक अल्बम ही रिलीज झाला आहे.
क्रिकेटच्या मैदानावर घोँगावणार हे वादळ आज पासून विश्रांतीवर गेलय. तरुणांना संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे अस म्हणत एबी ने क्रिकेट मधून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केलाय.त्याला मैदानावर पुन्हा खेळताना पाहता येणार नाही ही गोष्ट पचवणे त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच अवघड असेल. असो क्रिकेट मधून आम्हाला एंटरटेन करण्यासाठी थँक्यु डी'व्हिलियस्....एक चांगला माणूस बनण्यासाठी तूझ्याकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत...
We will miss you..
- मुक्ताफळ
(कु.मुक्ता भारत शिंदे.)
जुनं ते सोनं : इतिहासाचा मौल्यवान खजिना
काल बाथरूममधून पाणी पुढे जात नव्हतं. पाणी कुठे तरी chock up झालं असणार.. ड्रेनेज क्लीनिंग पावडर टाकून वैगेरे हा प्रश्न सुटेल असं...
-
तीन वर्षांपूर्वी पुण्यात प्रवेश करताना मी जेवढी अस्वस्थ होते तेवढीच अस्वस्थ आज आहे. तीन वर्षांपूर्वीचा तो दिवस आजही मला लख्ख आठवतो. एस...
-
काल बाथरूममधून पाणी पुढे जात नव्हतं. पाणी कुठे तरी chock up झालं असणार.. ड्रेनेज क्लीनिंग पावडर टाकून वैगेरे हा प्रश्न सुटेल असं...
-
खूप प्रवास बाकी आहे असं म्हणत स.प.महाविद्यलयाचा निरोप घेतला होता.डेक्कन कॉलेजला ऍडमिशन मिळालं आणि या प्रवासाला खऱ्...

